15 October 2019

News Flash

विठ्ठल-बिरदेव यात्रेला पट्टणकोडोलीत प्रारंभ

विठ्ठल-बिरदेव चांगभलंचा अखंड जयघोष, खारीक-भंडाऱ्याची उधळण, कैताळ-हलगीचा निनाद अशा वातावरणात बुधवारपासून पट्टणकोडोली येथील विठ्ठल-बिरदेव यात्रेला प्रारंभ झाला.

विठ्ठल-बिरदेव चांगभलंचा अखंड जयघोष, खारीक-भंडाऱ्याची उधळण, कैताळ-हलगीचा निनाद अशा वातावरणात बुधवारपासून पट्टणकोडोली येथील विठ्ठल-बिरदेव यात्रेला प्रारंभ झाला. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश आदी राज्यांतून आलेल्या लाखो भाविकांनी भंडा-यामध्ये न्हाऊन निघत विठ्ठल-बिरदेवाचे दर्शन घेतले.
हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथील विठ्ठल-बिरदेवाची यात्रा चार दिवस भरते. धनगर समाजाचे विविध राज्यांतील भक्तगण पट्टणकोडोली येथे लाखोंच्या संख्येने दाखल झालेले असतात. धार्मिक परंपरेनुसार बुधवारी यात्रेला प्रारंभ झाला. सकाळी मानाच्या तलवारीचे पूजन चावडीवर झाले. जोशी, आवटे, चौगुले, नाजरे, धनगर समाजाचे पंच आदींचा लवाजमा फरांडे बाबांच्या भेटीसाठी वाजतगाजत निघाला.प्रथेप्रमाणे विविध मंदिरांना भेटी देत भक्तगणांचा मेळा दगडी गादीजवळ दाखल झाला. गेल्या तीन दिवसांपासून येथे फरांडे बाबा विराजमान झाले होते. मानक-यांनी त्यांना आलिंगन देऊन मंदिरात येण्याची विनवणी केली. त्यानंतर पुन्हा सर्वजण सवाद्य मिरवणुकीने मंदिराकडे निघाले. या वेळी फरांडे बाबांच्या पोटावर तलवारीने वार करण्याचे हेडामनृत्य बाबांच्या जयघोषात पार पडले. या वेळी भंडाऱ्याची मुक्तहस्ताने उधळण करण्यात आल्याने अवघा परिसर पिवळाधम्मक झाला होता. परंपरेप्रमाणे बाळलोकर, खारीक, पैसे यांचीही उधळण करण्यात आली. मंदिरात पोहोचल्यानंतर पूजाविधी झाल्यानंतर भाकणुकीचा कार्यक्रम पार पडला.
यात्रेनिमित्त प्रशासनाने चोख व्यवस्था व नेटका पोलीस बंदोबस्त ठेवला होता. प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, तहसीलदार गुरू बिराजदार, पोलीस उपअधीक्षक चैतन्य एस. यांच्यासह पंचवीस पोलीस अधिकारी, २५० पोलीस यात्रेवर लक्ष ठेवून होते. कोल्हापूर-हुपरी मार्गावर असलेल्या पट्टणकोडोली गावात वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी एकेरी वाहतूक राबविण्यात आली होती. भाविकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन मंडळाने जादा बसेसची सोय केली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने यात्रामार्गाची डागडुजी केल्याने वाहतूक सुरळीत सुरू राहिली. प्रशासनाने दर्शन रांग, सीसी टीव्ही, दिशादर्शक फलक यांचे योग्य नियोजन केले होते. पंच कमिटीने यात्रेसाठी आलेल्या दुकानांचे वस्तुनुरूप विक्री व्यवस्था केली होती. जि. प. सदस्य धैर्यशील माने यांच्या प्रयत्नाने पट्टणकोडोलीला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्याने तसेच जिल्हा नियोजन मंडळाकडून विशेष निधी मिळाल्याने यात्रेला अनुकूल अशी अनेक विकासकामे झाल्याने त्याचा यात्रेकरूंना लाभ झाल्याचे दिसत होते.

First Published on October 24, 2013 1:50 am

Web Title: vitthal birdev pilgrims start in pattan kodoli
टॅग Kolhapur,Start