नवी मुंबई महापालिका निवडणुकीत सीबीडी बेलापूर, सीवूड नेरुळ परिसरात मतदानासाठी सर्वपक्षीय उमेदवारांनी साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर करून आपल्या बाजूने मतदान करण्याचा प्रयत्न केला. या मतदान प्रक्रियेत शहरातील गावकऱ्यांनी उत्साहात मतदान केल्याचे दिसून आले, तर शहरी सोसायटय़ांमध्ये राहणाऱ्या मतदारांचा संमिश्र प्रतिसाद होता. सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर मतदान केंद्रांवर रांगाच रांगा लागल्याचे चित्र होते. मात्र दुपारी उन्हाचा तडाखा जाणवू लागल्यानंतर मतदान केंद्रांवरील मतदारांची संख्या रोडावलेली होती.
सीबीडी बेलापूर येथील वॉर्ड क्रमांक १०२ या परिसरात अनेक ठिकाणी टेबल लावून कार्यकर्ते बसले होते. नियमानुसार दोन बूथ लावण्याची अट असताना सोसायटी तसेच विभागा-विभागातून बूथ बसविण्यात आलेले होते. प्रभाग क्रमांक १०९ मध्येही हीच स्थिती होती. या ठिकाणी तर ८ बूथ लावण्यात आले होते. त्यातील दोन बूथवर कारवाई करण्यात आली. उपमहापौर अशोक गावडे यांची छबी असलेल्या मतदार पावत्या वाटल्या जात होत्या. त्या जप्त करण्यात आल्या. शहरातील स्थानिक गावकऱ्यांमध्ये मतदानाचा उत्साह चांगला होता. उन्हाचा तडाखा सोसत ते मतदान करीत होते; परंतु उच्चभ्रू सोसायटीत मात्र मतदारांचा प्रतिसाद संमिश्र होता. त्यांना मतदानासाठी उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांना विनवणी करावी लागत होती. त्याला प्रतिसाद देऊन काही जण मतदानाला जात असल्याचे चित्र येथे पाहावयास मिळत होते.
 मतदारांच्या नावाची नोंद पाहण्यासाठी लॅपटॉप तसेच मोबाइलवरील मतदार याद्यांचाही वापर केला जात होता, तर वॉर्ड क्रमांक १०३ मधील पीपल्स एज्युकेशनच्या केंद्राबाहेर उमेदवार उन्हाचे चटके लागत असल्याने वृक्षांची सावली शोधत होते. यापैकी काही उमेदवार वडापाववर ताव मारतच मतदारांना इशारे करून मतदान करण्यास सांगत होते. मध्येच पोलीस यंत्रणा घोळक्यात उभ्या असलेल्या मतदार, उमेदवार तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधींना अटकाव करीत होती. अनेक ठिकाणी विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती.
सीवूड येथील वॉर्ड क्रमांक ९९ मधील अनेकांनी विधानसभेला मतदान केले असतानाही या वेळी त्यांची नावे मतदार यादीत नसल्याने त्यांना मतदान करता आले नाही. येथील महेश कोडी एस पायस यांच्या पत्नीचे नाव आहे, मात्र त्यांचे नाव मतदार यादीतून गायब झाले होते. अशा अनेक कुटुंबांची नावे गायब असल्याचेही त्यांनी सांगितले. नेरुळ, सीवूड परिसरांतील  मतदान केंद्रांवर दहशत निर्माण करण्यात येत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्याने ठाण्याचे माजी खासदार व राष्ट्रवादीचे नेते संजीव नाईक यांनी या परिसरात भेट देऊन पाहणी केली.

 जगदीश तांडेल, उरण