नाशिकच्या वेतन पडताळणी कार्यालयाचा सहायक अधीक्षक नंदकुमार नारायणदास बैरागी याला नगरमध्ये ७ हजार रूपये लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रंगेहाथ पकडला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृह क्रमांक २ (यशांजली हॉटलच्या समोर) आज सायंकाळी बैरागी सापळ्यात सापडला.
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातील मोहीम अधिकारी दत्तात्रय रंभाजी राऊत यांनी बैरागीच्या विरोधात तक्रार केली होती. त्यांचे वेतन पडताळणी कार्यालयात वेतन निश्चिती करून घेण्याचे काम होते. त्या कामासाठी बैरागी याने त्यांच्याकडे ७ हजार रूपयांची मागणी केली. त्याचा वेतन पडताळणी कॅम्प आज नगरला होता. तिथे त्याने राऊत यांना पैसे घेऊन बोलावले.
राऊत यांनी आधीच लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार दिली होती. या विभागाचे नाशिकचे अधीक्षक शशीकांत सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगर विभागाचे पोलीस उपअधीक्षक ए. आर. देवरे, पोलीस निरीक्षक पी. एम. मोरे, आर. पी. माळी, तसेच अरूण बांगर, शैलेंद्र जावळे, राजेंद्र खोंडे, संजय तिजोरे, रविंद्र पांडे, श्रीपादसिंग ठाकूर, प्रमोद जरे, दशरथ साळवे, राजेंद्र सावंत यांनी ही कामगिरी केली. बैरागीला येथे पकडल्यानंतर लगेचच नाशिकला त्याच्या घराची झडती घेण्याचे काम पोलिसांनी तिथे सुरू केले.