दिवाळीची धामधूम संपताच गिर्यारोहण आणि गिरीभ्रमंती करणाऱ्यांची पावले पुन्हा एकदा भटकंतीसाठी घराबाहेर पडू लागली असून त्यासाठी मित्रमंडळींना जमवून कोणत्या गड-किल्ल्यावर स्वारी करायची, याची योजना आखली जात आहे, परंतु एखाद्या व्यक्तीला अशी आवड असली तरी त्याच्या मित्रांना भटकंती करणे आवडेलच असे नाही. त्यामुळे अशा एकटय़ा व्यक्ती निराश होतात. अशा व्यक्तींना येथील वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण संस्थेच्या वतीने आपली हौस पूर्ण करता येणार आहे. या संस्थेने २४ नोव्हेंबरपासून ते २० जानेवारीपर्यंत विविध गड-किल्ल्यांवर जाण्याचा कार्यक्रम आखला आहे.
इगतपुरी पर्वत रांगेतील घारगड, कळसूबाई पर्वत रांगेतील अलंग, मदनगड आणि सह्य़ाद्रीतील आणखी काही गड-किल्ले अशी आहेत की इंग्रजांनी पायऱ्या तोडून टाकल्याने वर जाण्याचे चांगले रस्ते बंद झाले. त्यामुळे अशा ठिकाणी रोप क्लायम्बिंग, रॅपलिंग अशा मार्गाचा अवलंब करावा लागतो. त्यासाठी या संस्थेतर्फे मोहिमेची सुरुवात २४ नोव्हेंबर रोजी अंजनेरी येथे रॅपलिंग, रॉक क्लायम्बिंग शिबिराने होणार आहे. त्यानंतर २९ नोव्हेंबर रोजी रोहिडा, शिवथर घळ, कावळा, ३० नोव्हेंबर रोजी गोप्या घाट अशी भटकंती राहील.
७ डिसेंबर रोजी मेसणा, कातरा, अंकाई-टंकाई, ८ डिसेंबर रोजी मनमाड परिसर, २१ डिसेंबर रोजी भास्करगड, उटवड, २२ डिसेंबर रोजी त्र्यंबकेश्वर परिसरातील हरिहर, ब्रह्मा असा कार्यक्रम राहणार आहे.
पुढील वर्षांची सुरुवात ४ जानेवारी रोजी हरिश्चंद्र गडावरील स्वारीने होईल. त्यानंतर १७ ते २० जानेवारी या कालावधीत अलंगगड, मदनगड, कुरंगगड अशी भटकंती होईल. त्यात पहिल्या दिवशी दुपारी दोन वाजता नाशिकहून प्रस्थान. भंडारदरामार्गे उडदावणे येथे मुक्काम. १८ जानेवारी रोजी अलंगगडवर स्वारी (मुक्काम गडावर), १९ जानेवारी रोजी मदनगडाची भटकंती (मुक्काम आंबेवाडी), २० जानेवारी रोजी कुरंगगडावर स्वारी झाल्यानंतर रात्री आठ वाजेपर्यंत नाशिकला परत अशी मोहीम आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी संस्थेच्या अविनाश जोशी ९९२१२९९३४२, राहुल सोनवणे ९३७३९००२१९ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.