कृषी पंपाच्या थकबाकीसाठी सुरू असणारी सक्तीची वसुली थांबावी या मागणीसाठी जिल्हय़ातील मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता व सर्व ८२ वीज केंद्रांत २ सप्टेंबर रोजी टाळे ठोकून आंदोलन केले जाईल, असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी आज सांगितले.
जिल्हय़ात दुष्काळी स्थिती असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता सरसकट वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्याच्या विरोधात जिल्हय़ात एकाच वेळी निदर्शने करण्यात येणार आहेत.
रस्ते दुरुस्तीच्या कामाला लागा
ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. जिल्हय़ातील रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी सूचना खासदार चंद्रकांत खैरे यांनी मुख्य अभियंता सी. पी. जोशी यांनी केली आहे. क्रांती चौक ते चिक लठाणा, दिल्लीगेट ते हर्सूल, महानुभव ते नक्षत्रवाडी, पंचवटी चौक ते रेल्वे स्टेशन या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्यासंदर्भात अभियंत्यांनी लक्ष घालावे. निधी नसेल तर गट ब मधील निधीतून खर्च करण्याचा प्रस्ताव सादर करावा, पंतप्रधान सडक योजनेतून दुरुस्ती करता येऊ  शकते, असेही खैरे म्हणाले.