मराठवाडय़ाला हक्काचे पाणी नाकारणाऱ्या नगर-नाशिकच्या नेतृत्वासोबत सामंजस्याने काय बोलणार? जायकवाडीच्या पाण्याबाबत सामोपचाराने तोडगा काढणाऱ्या शरद पवारांनी मराठवाडय़ाला सामंजस्याने नव्हे, तर कायद्याने हक्काचे पाणी देण्याची भाषा करावी, असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार विजय गव्हाणे यांनी व्यक्त केले.
पवारांच्या मराठवाडा दौऱ्यात राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर या प्रश्नी सामोपचाराने तोडगा काढण्याची भूमिका पवारांनी मांडली. मात्र, गव्हाणे यांनी पवारांच्या भूमिकेवर टीका केली. मराठवाडय़ात पाण्याच्या प्रश्नावर संघर्ष व्हायला नको. या प्रकरणी सामोपचाराने तोडगा काढायला हवा, अशी भूमिका घेणाऱ्या पवारांनी नाशिकला बठकीचे आयोजन करणार असल्याचे म्हटले होते. पवारांना मराठवाडय़ाने अजूनही सामंजस्यावरच विश्वास ठेवावा, असे वाटते काय? असा प्रश्न गव्हाणे यांनी विचारला.
एकीकडे खरीप हंगामात नगर-नाशिक जिल्ह्यांत पिकांसाठी पुरेशी आवर्तने मिळत असताना दुसरीकडे मराठवाडय़ात रब्बीसाठी एक आवर्तन मिळणेसुद्धा दुरापास्त झाले आहे. अशा स्थितीत मराठवाडय़ावर अन्यायाची परिसीमा ओलांडली गेली आहे. मराठवाडय़ासाठी सोडलेल्या पाण्यावर डल्ला मारला जातो. या सर्व वस्तुस्थितीकडे पवारांनी डोळेझाक करू नये. मराठवाडय़ाला सामंजस्याची भाषा सांगणाऱ्या पवारांना कदाचित मराठवाडय़ाने आणखी स्वस्थ बसावे असे वाटत असेल, मराठवाडय़ाला आता सामोपचाराने पाणी देण्याचे औदार्य पवारांनी दाखवू नये, कायदा काय सांगतो, न्यायालये काय सांगतात, याकडे पवारांनी लक्ष द्यावे, असेही गव्हाणे म्हणाले.