मुंबईमध्ये असह्य़ उकाडा जाणवत असतानाच गेल्या महिन्याभरापासून उपनगरांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. घरात येणारे गंगाजळ आटल्याने वांद्रे, खार, मालाड, मढ, मालवणी, अंधेरी, मरोळ, मरोशी, गोरेगाव, घाटकोपर आणि आसपासचा परिसर, तसेच टेकडय़ांवरील वस्त्यांमधील रहिवासी संतापले असून त्यांना उत्तरे देताना नगरसेवकांना पळता भुई थोडी होऊ लागली आहे. तांत्रिक कामाची सबब पुढे करीत लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. पण आजही पाणी प्रश्न सोडविण्यात प्रशासन अपयशी ठरले असून आता नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.
महापालिकेकडून दर दिवशी मुंबईकरांना सुमारे ३९५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. मात्र मुंबईकरांच्या घरापर्यंत हे पाणी पोहोचण्यापूर्वीच चोरी आणि गळतीमुळे बरेचसे पाणी गायब होते. आता गेल्या महिन्याभरापासून उपनगरांमधील विविध भागांमधील पाणीपुरवठा अचानक आटला आहे. पाणी कमी झाल्यामुळे उपनगरवासीयांच्या मनात संशयाची पाल चुकचुकू लागली आहे. आरे परिसरात होऊ घातलेल्या ‘मेट्रो-३’च्या यार्डमुळे जलवाहिन्या बदलण्यात येत असून त्यामुळे पाण्याची समस्या निर्माण झाल्याची जोरदार चर्चा गोरेगाव आणि आसपासच्या परिसरात सुरू झाली आहे. तर जीर्ण जलवाहिन्यांतून होणारी गळती आणि झोपडपट्टय़ांमधील पाणी माफियांकडून होणारी चोरी, तसेच अधूनमधून फुटणाऱ्या जलवाहिन्या आदी कारणांमुळे पाणी कमी येत असल्याची ओरड काही विभागांतील नागरिक करू लागले आहेत.

पाणी कधी मिळणार?
सुमारे महिन्याभरापूर्वी परळ येथील जलवाहिनी फुटली आणि त्याचा फटका घाटकोपर आणि आसपासच्या परिसराला बसला आहे. घाटकोपरमधील राजावाडी, महात्मा गांधी रोड, पंतनगर, लक्ष्मीबाग, लक्ष्मी नगर आदी विभागांतील पाणीपुरवठा आटला असून आजतागायत त्यात सुधारणा करण्यात पालिका अपयशी ठरली आहे. या परिसरात अत्यंत कमी दाबाने आणि कमी पाणीपुरवठा होत आहे. वारंवार तक्रारी करूनही ही समस्या सोडविण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रश्न उपस्थित केल्यानंतरही समाधानकारक उत्तर मिळू शकलेले नाही. मग या विभागातील रहिवाशांचा पाणीपुरवठा सुरळीत कधी करणार, असा सवाल काँग्रेस नगरसेवक प्रवीण छेडा यांनी केला आहे.

नागरिकांना अंधारात का ठेवले?
गेल्या काही दिवसांमध्ये वांद्रे ते दहिसरदरम्यानच्या परिसरातील काही विभागांमध्ये नागरिकांना कमी पाणीपुरवठा होऊ लागला आहे. पण त्यामागचे नेमके कारण काय हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे. आरे परिसरात होऊ घातलेल्या ‘मेट्रो-३’ प्रकल्पामुळे काही भागात तुळशी तलावातून केला जाणारा पाणीपुरवठा बंद करण्यात येत आहे. यापुढे या भागाला वैतरणा जलवाहिनीतून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, अशी जोरदार चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. या कामांमुळे गोरेगाव, अंधेरी, मरोळ, मरोशी येथील काही भागांमध्ये कमी पाणी मिळत आहे. या कामांबाबत नागरिकांना अंधारात ठेवले आहे, असा सवाल अंधेरी परिसरातील समाजसेवक अजिज अमरेलिवाला यांनी केला आहे.

‘पुरवठा सुरळीत होईल’
उपनगरवासीयांना स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा करता यावा यासाठी पालिकेने मरोळ-मरोशी जलबोगदा बांधला आणि आता तो कार्यान्वितही करण्यात आला आहे. काही ठिकाणी जलबोगद्याला जलवाहिन्या जोडण्याची कामे सुरू आहेत. परिणामी काही भागांना कमी पाणीपुरवठा होऊ लागला आहे. मात्र त्यामागची कारणे शोधून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. लवकरच उपनगरतील पाणीपुरवठा पूर्ववत होईल आणि नागरिकांना स्वच्छ पाणी मिळू लागेल, असे पालिकेच्या जल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. ‘मेट्रो-३’बाबत या परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. मात्र ‘मेट्रो-३’साठी जलवाहिन्या बदलण्याची कोणतीही कामे हाती घेतलेली नाहीत, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.