पनवेलमध्ये पळस्पे येथे होणाऱ्या साई वर्ल्ड सिटी प्रकल्पात गुंतवणूकदारांची गर्दी हा पनवेल मधील जागेचा भाव वधारल्याची साक्ष देणारा असला तरी पनवेलचे सध्याचे पायाभूत सुविधांचे वास्तव हे अगदी उलटे आहे याकडे पनवेलकरांनी पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन राज्याचे गृहनिर्माणमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पनवेलमधील आतापर्यंत झालेल्या गृहसंकुल प्रकल्पांमधील समस्यांचे वास्तव चित्र पनवेलकरांनी पुन्हा एकदा उभे केले आहे. गगनचुंबी इमारत प्रकल्पाचे उद्घाटन करताना येथे भेडसावत असलेल्या पाणी प्रश्नातही पालकमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष घालून पनवेलकरांची तहान भागवावी, अशी मागणी त्यानिमित्त पुढे आली आहे.
दीडशे वर्षांच्या पनवेल नगर परिषदेला दर वर्षी पिण्याच्या पाण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे हात पसरावे लागतात. नगर परिषदेच्या मालकीचे देहरंग धरणाची पाण्याची क्षमता कमी असल्याने पुरेसा पाणीपुरवठा करता येत नाही. पनवेलच्या ग्रामीण भागात आजही ग्रामस्थ बोअरपंपाचे पाणी पितात. पनवेलच्या नेरे भागातील इमारतींमधील रहिवासी पाण्याच्या सीलबंद बाटल्यांमधील पाणी पिऊन आपला दिवस ढकलत आहेत. सिडको वसाहतींचा काही भाग हेटवणे धरणातून व काही परिसर मोरबे धरणाच्या पाण्यावर तरला आहे. मात्र येथील रहिवाशांची पाण्याची बोंब हे नित्याचे झाले आहे. कामोठेचा पाणी प्रश्न नुकताच आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेच्या अधिवेशनात मांडला होता. सिडको, पनवेल नगर परिषद, एमएमआरडीए ही प्रशासने बांधकामांना परवानगी देतात. ही बांधकामे पूर्ण झाल्यावर त्यामध्ये कोटी रुपयांची घरे घेणाऱ्या रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ येते. अशी येथे गंभीर परिस्थिती असून ही समस्या उद्भवू नये यासाठी प्रशासनाने पावले उचलणे गरजेचे आहे, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
त्याचप्रमाणे ग्रामीण भागात आजही ग्रामस्थांना विजेचे भारनियमन सोसावे लागते. शहरात रोज जाणारी वीज यामुळे पनवेलकरांना भर उन्हाळ्यात उष्म्याचा सामना करावा लागत आहे.
आठवडय़ातील एक दिवस वीजपुरवठा बंद ठेवून विजेच्या जुनाट यंत्रणेची दुरुस्ती कामे हाती घेतली जातात; परंतु अजूनही येथील वीजव्यवस्थेत सुधारणा झालेली नाही.विकासाच्या वाटेवर वर्ल्ड सिटी उभारण्यासाठी सामान्यांचा कधीही खोडा राहिला नाही, मात्र श्रीमंतांच्या या चंदेरी दुनियेत सामान्य पनवेलकरांचे पाण्याचे हाल पालकमंत्र्यांनी थांबवावे एवढीच अपेक्षा पनवेलकर करीत आहेत.

२० हजार लोकवस्तीचा प्रकल्प
पळस्पे येथील ४२ एकर जमिनीवर साई वर्ल्ड सिटी हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पात ४२ मजल्यांचे १३ गगनचुंबी इमारती, साडेतीन हजारांहून अधिक सदनिकांचा त्यात समावेश आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास आल्यास या सदनिकांमध्ये राहणारे अठरा हजारांहून अधिक रहिवाशांसह सुरक्षा व इतर कामगारवर्ग असे एकूण २० हजार लोकवस्तींचे हे ठिकाण होणार आहे.

कोंडाणे धरणाचा स्वतंत्रपणे विकास आवश्यक
पनवेल शहर व तालुक्याचा ग्रामीण परिसरांत पाण्याची वणवण बंद होण्यासाठी यापूर्वीच आपण सरकारदरबारी हा प्रश्न मांडला आहे. कामोठय़ाच्या पाणी प्रश्नानंतर सिडको प्रशासनाकडे तशी मागणी केली आहे. सिडकोने वसाहतींच्या पाण्याच्या नियोजनासाठी कोंडाणे धरणाचा स्वतंत्रपणे विकास करून त्याद्वारे पनवेलकरांची तहान भागविल्यास हा प्रश्न काही अंशी सुटेल. एमएमआरडीएमध्ये याआधी मी सदस्य असताना याबाबत आवाज उठवला आहे. सरकारने पनवेलच्या भविष्यातील विकासाचा विचार करून भावी २५ वर्षांच्या पाणी व विजेसाठी नियोजित आराखडा बनवणे गरजेचा आहे. आराखडा बनविल्यानंतर तो आराखडा प्रत्यक्षात अंमलबजावणीस आला पाहिजे, अशी मागणी आहे.
प्रशांत ठाकूर, आमदार, पनवेल</p>

पाणी व विजेची गैरसोय होणार नाही
साई वर्ल्ड सिटी व एमएमआरडीएचा हा प्रकल्प आहे. साई वर्ल्ड सिटी उभारण्यासाठी नयना प्राधिकरणासोबत विविध विभागांच्या परवानग्या कंपनीने मिळविल्या आहेत. येथे कोणत्याही प्रकारची पाणी व विजेची गैरसोय असणार नाही.
जितू पंजाबी, सेल्स व्यवस्थापक