कळंबोली नोडमध्ये दिवसाला पाचशेहून अधिक रुग्णांवर उपचार करणाऱ्या सिडकोच्या नागरी आरोग्य केंद्रात गेल्या दोन महिन्यांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने रुग्णांसह डॉक्टरांचेही हाल होत आहेत.
सिडकोने सुरू केलेले हे आरोग्य केंद्र  नवीन पनवेल, कळंबोली या वसाहतींमधील  रहिवाशांसाठी उपयुक्त ठरले आहे. बालकांचे लसीकरण येथे केले जाते. ताप, खोकला यांसारखे साथीचे आजार तसेच क्षयरोग, श्वानदंश यांसारख्या आजारांवर येथे उपचार केले जातात. सरकारी वैद्यकीय दराने मिळणाऱ्या उपचारामुळे येथे दिवसाला पाचशेहून अधिक रुग्ण येत असतात. अशा या समाजोपयोगी केंद्रात मात्र पाण्याचा ठणाणा आहे. गेल्या दोन महिन्यांपासून येथे पाणी नसल्याने या केंद्रातील आरोग्य सेवक हैराण झाले आहेत. बाटलीबंद पाण्यावर रुग्णालयाची तहान भागविली जाते. पाणी मिळत नसल्याचा सर्वाधिक त्रास लहान मुलांना सहन करावा लागतो. पाण्याची सोय नसल्याने बालकांना पाण्याविना डॉक्टर तपासणी करून घ्यावी लागते. येथील शौचालयात पाणी नसल्याने दरुगधी पसरत आहे.
आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर पाणीपुरवठय़ाची टाकी आहे. मागील दोन महिन्यांपासून कळंबोली परिसरामध्ये पाण्याचा दाब कमी असल्याने उंचीवर असणाऱ्या पाण्याच्या टाक्यांपर्यंत पाणी पोहोचत नाही. त्याचाच फटका या केंद्रालाही बसला असल्याचे सांगण्यात येते.