उसाला ३५०० रुपये दर मिळावा या मागणीसाठी गुरुवारी शिवसेनेच्या वतीने पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर किणी टोलनाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात आमदार राजेश क्षीरसागर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते. ३५०० रुपये दर मिळावा या मागण्यांच्या घोषणा देत शिवसैनिकांनी अध्र्या तासाहून अधिक काळ राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊन रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची भली मोठी रांग लागली होती. अखेर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. आंदोलनस्थळी मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.