जिल्ह्य़ात दुष्काळी स्थिती असताना सरकारकडून शेतकऱ्यांची उपेक्षा सुरू आहे. जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. आता सरकारला धडाच शिकविला पाहिजे, असा इशारा माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी दिला.
खोतकर यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी पीर पिंपळगाव, घाणेवाडी, माळशेंद्रा, वाघ्रुळ, जामवाडी, कुंभेफळ, गोंदेगाव आदी गावांत निर्माण झालेली दुष्काळी स्थिती जाणून घेतली. उपस्थित शेतकऱ्यांसमोर खोतकर बोलत होते.  यावेळी बोलताना अंबेकर यांनी सांगितले की, दुष्काळामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या मागे शिवसैनिकांनी खंबीरपणे उभे राहावे. सरकारने राज्यात सर्वात कमी पाऊस पडलेल्या जालना जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले. टंचाईग्रस्त गावांतील वीज जोडणी तोडण्याचा सपाटा लावून आपण शेतकरीविरोधी असल्याचेच दाखवून दिले. सत्ताधारी पक्षाचे जिल्ह्य़ातील लोकप्रतिनिधी दुष्काळावर तोंड उघडण्यास तयार नाहीत. परंतु शिवसेना या स्थितीत सर्वसामान्यांबरोबर आहे, असे त्यांनी सांगितले.