News Flash

विदर्भात श्रीगणरायाचे जल्लोषात आगमन, चंद्रपुरात रिमझिम सरींनी स्वागत

‘गणपती बाप्पा मोरया' चा जयघोष करत विघ्नहर्त्यां गणरायाचे घरोघरी, तसेच सार्वजनिक गणेश मंडळाच्या मंडपात आज विदर्भात उत्साहात आगमन झाले

| September 10, 2013 09:23 am

‘गणपती बाप्पा मोरया’ चा जयघोष करत विघ्नहर्त्यां गणरायाचे घरोघरी, तसेच सार्वजनिक गणेश मंडळाच्या मंडपात आज विदर्भात उत्साहात आगमन झाले आणि दहा दिवसीय गणेशोत्सवाला आनंदमय वातावरणात सुरुवात झाली. चंद्रपूरसह काही ठिकाणी मेघगर्जनांसह पावसाच्या रिमझीम सरींनी गणरायाचे स्वागत केले.
या जिल्ह्य़ात अठराशेवर गावे असून जवळपास १६०० सार्वजनिक गणपतींची स्थापना दरवर्षी होते. यंदाही एवढय़ाच सार्वजनिक गणपतींची स्थापना झाली. तसेच घरोघरीही विघ्नहर्त्यांचे उत्साहात आगमन झाले. एकटय़ा चंद्रपूर शहरात जवळपास २६० गणपतींची स्थापना झालेली आहे. शहर व रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत या सर्व गणेशाची स्थापना झालेली आहे. मात्र, धर्मदाय आयुक्त कार्यालयात केवळ ५०० गणेश मंडळांची नोंदणी आहे. कस्तुरबा मार्गावरील कुंभार मोहल्ल्यात, तसेच आझाद बागेलगत मूर्तीकारांसाठी मनपाने मंडपाची व्यवस्था करून दिली. तेथे आज सकाळपासून गणेशाची मूर्ती घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. सकाळी आठ वाजतापासूनच गणेशभक्त गणपती बाप्पा मोरया..चा जयघोष करत ढोलताशांच्या दणदणाटात गणपतीचे उत्साहात स्वागत करत होते, तर घरोघरी मंगलमय आरतींचे स्वर कानी पडत होते. सायंकाळी सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी या मार्गावर गर्दी केलेली होती. जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक जैन, तसेच इतर खात्यांचे अधिकाऱ्यांनी सहकुटूंब गणरायाचे स्वागत केले.
छत्रपती नगरातील गणेश मंडळाने तर चार दिवसापूर्वीच श्रीची भव्य मूर्ती मंडपात आणून ठेवली असून चांगला देखावा सादर करण्याची तयारी सुरू आहे. चंद्रपूरचा राजा म्हणवणाऱ्या जटपुरा गेटजवळील भव्यदिव्य मूर्ती आकर्षणाचा केंद्र बनली आहे. या मंडळाने व्दारकाधीशाची प्रतिकृती साकारली आहे. तसेच राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय, श्री साई अभियांत्रिकी महाविद्यालय व शहरातील मंदिरातही गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. विठ्ठल मंदिर वॉर्डातील पुरातन गणेश मंदिरात श्रीचे वाजतगाजत आगमन झाले. गणेशोत्सवाच्या काळात कुठल्याही प्रकारची दंगल किंवा वाईट घटना घडू नये म्हणून जिल्हा पोलीस दलाने कडक बंदोबस्त तैनात ठेवला आहे. चंद्रपूर शहरासोबतच जिल्ह्य़ातील पंधराही तालुक्यात विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दंगानियंत्रण पथक व पोलीस दलाचे विशेष कमांडो येथे सक्रीय आहेत.
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर बाजारपेठा फुलल्या आहेत. अतिवृष्टी व पुरात हजारे लोकांचे संसार उध्वस्त झाल्यानंतर विघ्नहर्त्यांचे आगमन झाल्याने सार्वजनिक गणेश मंडळांनी कुठल्याही प्रकारे पैशाची उधळपट्टी होणार नाही व सामाजिक सौहाद्र्र कायम राहावे व सामाजिक भान शाबून ठेवत समाजाला सहकार्य करावे, असे आवाहन विविध स्वयंसेवी संस्थांनी केले आहे. सामाजिक स्वस्थ बिघडणार नाही याची सर्वानी काळजी घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनेही करण्यात आले आहे.
शहरात तगडा पोलीस बंदोबस्त
अकोला- श्रीगणरायाचे अत्यंत पारंपारिक उत्साहात, तसेच ढोलताशांच्या दणदणाटात शहरात सर्वत्र स्वागत करण्यात आले आहे. आज चतुर्थीला घरोघरी श्रीगणरायांचे आगमन होऊन विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली, तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आकर्षक सजावटीचे भव्य मंडप उभारून गणरायाची स्थापना केली.  सायंकाळपावेतो सर्व दुकानांवर गणेश मूर्ती घेण्यासाठी भाविकांच्या झुंडी लोटल्या होत्या. दुपारनंतर पावसाळी वातावरण झाले होते. गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या वस्तूंनी बाजारपेठ भरली आहे.   
प्रसिद्ध जुने शहर भाग, तसेच गांधी चौक, अशोक वाटिका चौक, जेल चौक, जुने आयकर कार्यालय, तुकाराम चौक, कौलखेड चौक, जठारपेठ चौक आदि भागात अनेक ठिकाणी गणरायाच्या अत्यंत सुबक मूर्ती होत्या. यंदा मूर्तीच्या किमतीही खूप वाढल्या आहेत. श्रींची मूर्ती घेण्यासाठी भाविकांची सकाळ पासूनच झुंबड उडाली होती. गुलालाची उधळण करीत व गणपती बाप्पा मोरयाच्या गगनभेदी गर्जना करीत भाविकांनी अत्यंत जल्लोषात श्रींची स्थापना घरोघरी केली. यंदाही हैदराबाद येथूनही मूर्तीची विक्री येथे करण्यात आली. अशोक वाटिका चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत अनेक दुकाने लागलेली आहेत.प्रत्येक दुकानदाराकडून मनपाने ३०० रुपये घेतले आहेत. गेल्याच आठवडय़ातील कावडयात्रेवर झालेली दगडफेक लक्षात घेता पोलिसांनी शहरात तगडा बंदोबस्त लावला आहे. शहरात व जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी कॅमेरे लावले आहेत. शिवाय फिरते पथक गस्त घालणार आहे. या बंदोबंस्ता साठी ७ पोलीस निरीक्षक, ८ उपनिरीक्षक, १८२ पोलीस जवान, १४ महिला पोलीस, १५० गृहरक्षक व राज्य राखीव पोलीस दलाचे ८० जवान तैनात करण्यात आले आहेत.        
२३० गावात ‘एक गाव-एक गणपती’
बुलढाणा- जिल्ह्य़ात ढोलताशाच्या गजरात गणरायाचे आगमन झाले असून ८०१ गणेश मंडळांची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्य़ात गणेश मंडळांची संख्या सातत्याने वाढत आहे. महात्मा गांधी तंटामुक्ती अभियानाच्या सकारात्मक परिणामामुळे एक गाव-एक गणपती यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्य़ातील शहरी भागात ३२३, तर ग्रामीण भागात ४७८, अशी एकूण ८०१ गणेश मंडळांची नोंदणी झाली, तर २३० गावात एक गाव-एक गणपती हा स्तुत्यपूर्ण उपक्रम राबविल्या जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2013 9:23 am

Web Title: welcome of lord ganesha in vidarbh
टॅग : Vidarbh
Next Stories
1 शिक्षणशुल्क प्रतीपूर्तीसाठी फक्त ‘नॉन क्रिमिलेअर’ पुरेसे नाही
2 ढोलताशांच्या गजरात गणेशाची प्रतिष्ठापना
3 कामठीतील शानदार सोहळ्यात १९२ एएनओजना कमिशन
Just Now!
X