मुंबईतील गानलुब्धांची श्रवणपूजा बांधणाऱ्या ३७व्या गुणिदास संगीत संमेलनात यंदा शास्त्रीय संगीतातील दिग्गजांची मांदियाळी अवतरणार आहे. नेहरू सेंटर वरळी येथे ५, ६, ७ आणि १० डिसेंबर रोजी होणाऱ्या या संगीत संमेलनात संगीतमरतड पं. जसराज, पं. हरिप्रसाद चौरसिया, उस्ताद झाकीर हुसेन, पं. विश्वमोहन भट्ट, शुभा मुदगल आदी दिग्गज कलाकार भाग घेणार आहेत.
पं. सी. आर. व्यास यांनी १९७७मध्ये चालू केलेल्या या गुणिदास संगीत संमेलनात दरवर्षी एकापेक्षा एक दिग्गज कलाकार हजेरी लावतात. आग्रा घराण्याचे गायक पं. जगन्नाथबुवा पुरोहित उर्फ गुणिदास यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे संमेलन आयोजित केले जाते. यंदा हे संमेलन ५, ६, ७ आणि १० डिसेंबर असे चार दिवस होणार असून ५ डिसेंबरला या संमेलनाची सुरुवात बनारस घराण्याच्या संजीव आणि अश्वनी शंकर यांच्या सनई वादनाने होईल. त्यानंतर आग्रा घराण्याच्या शुभ्रा गुहा यांचे गायन होईल. पहिल्या दिवसाची सांगता पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीवादनाने होणार आहे.
दुसऱ्या दिवसाची सुरुवात पं. शिवकुमार शर्मा याचे शिष्य पं. धनंजय धैतनकर यांच्या संतूर वादनाने होणार आहे. या संतूर वादनानंतर आपल्या खडय़ा परंतु मखमली आवाजाने सुपरिचित असलेल्या शुभा मुदगल यांचे गायन होईल. तर या दिवसाचा समारोप ग्रॅमी पुरस्कार विजेते पं. विश्वमोहन भट्ट यांच्या मोहनवीणा वादनाने होणार आहे. तिसऱ्या दिवशी, ७ डिसेंबर रोजी आग्रा घराण्याच्या भारती प्रताप यांच्या गायनाने सुरुवात होईल. त्यानंतर धारवाड येथील उस्ताद रफिक आणि शफिक खान यांचे सतारवादन होणार आहे. संगीतमरतड पं. जसराज यांच्या सुरांनी या दिवसाच्या मैफलीची सांगता होईल.
संमेलनाच्या शेवटच्या दिवशी, १० डिसेंबर रोजी पं. सी. आर. व्यास यांचे पुत्र आणि ज्येष्ठ गायक पं. सुहास व्यास यांच्या गायनाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. संमेलनाची सांगता करण्यासाठी सारंगी वादक साबीर आणि दिलशाद खान यांच्यासह उस्ताद झाकीर हुसेन मंचावर उपस्थित असतील. हा कार्यक्रम नेहरू सेंटरमधील सभागृहात दर सायंकाळी ६.३० वाजता सुरू होणार आहे.