‘जब तक है जान’ने अमेरिकेत बक्कळ ‘यश’ कमावल्यानंतर अनेक हिंदी चित्रपटांच्या परदेशातील ‘कलेक्शन’ची चर्चा सुरू झाली आहे. मात्र विषयाच्या बाबतीत हिंदीच्या तोडीस तोड असलेले मराठी चित्रपट परदेशातील कमाईबाबत मागे असलेले दिसतात. याची नेमकी कारणे काय, मराठी चित्रपट परदेशात ‘मार्केट’ करण्यासाठी काय करता येईल, अशा अनेक प्रश्नांवर इंडस्ट्रीमधील कलाकार, निर्मात्यांनी व्यक्त केलेली ही मते..
मराठी नाटक, मराठी चित्रपट किंवा मराठी कला महाराष्ट्राबाहेर एखाद्या ठिकाणी पोहोचली की, लगेचच ‘अटकेपार मराठी झेंडा’ वगैरे शब्दांत आपण त्याची रसभरीत वर्णने करतो. मात्र खरेच मराठी नाटक किंवा चित्रपट परदेशात पोहोचला आहे का, हा प्रश्न सगळ्यांनीच एकमेकांना विचारण्याची गरज आहे, असे चित्र दिसत आहे. मराठी चित्रपट हिंदी चित्रपटांच्या तुलनेत विषयाच्या बाबतीत तोडीस तोड आहेत. पण महाराष्ट्राच्या काही भागांतही हे चित्रपट बघितले जात नाहीत, हे सत्य मराठी चित्रपटसृष्टीतल्या कलाकारांनाही नाकारता येणार नाही.
गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने मराठी चित्रपट राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले. तसेच परदेशात, विशेषत: अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी कुटुंबांमुळे मराठी चित्रपट जागतिक स्तरावर पोहोचल्याचे चित्रही निर्माण झाले. पण चित्रपटसृष्टीतील काही लोकांशी चर्चा केल्यानंतर ही गोष्ट तेवढी खरी नसल्याचे लक्षात येते. याबाबत देविशा फिल्म्सच्या अभिजीत घोलप यांचे मत विचारले असता, अमेरिकेतील अनेक महाराष्ट्र मंडळांच्या मदतीने मराठी चित्रपटसृष्टीतील निर्मात्यांना तेथे आपापल्या चित्रपटाचे खेळ करता येतील. सध्या घोलप मराठीतील दर्जेदार चित्रपट मोठय़ा स्तरावर प्रसिद्ध करण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या मते, अमेरिकेत एकाच वेळी चार-पाच चित्रपट घेऊन गेल्यास तेथील लोकांनाही ते फायद्याचे ठरते. एखादा दर्जेदार नवीन मराठी चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित झाल्यावर आणि त्याबाबत चांगले परीक्षण आल्यानंतर तो चित्रपट परदेशात प्रदर्शित करण्याचा घोलप यांचा मानस आहे. त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले असून कॅलिफोर्नियात प्रदर्शित झालेला ‘होऊ दे जरासा उशीर’ हा चित्रपट सर्वत्र वितरित करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे.
वाहिन्यांचे सॅटेलाइट हक्क
कोणताही मराठी निर्माता आजकाल चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वीच त्याचे सॅटेलाइट हक्क एखाद्या वाहिनीला विकून टाकतो. हाच फॉम्र्यूला परदेशातही वापरता येईल, असे वितरक समीर दीक्षित यांना वाटते. परदेशी वाहिन्यांनाही विविध भाषांमधील चित्रपटांची आवश्यकता असते. आपल्याकडेही फिलिपाइन्स, इराण आदी देशांमधील चित्रपट काही वाहिन्यांवर सबटायटल्सच्या मदतीने दाखवले जातात. त्याच धर्तीवर मराठी चित्रपटांचे हक्क निर्माते परदेशी वाहिन्यांना विकू शकतात. मात्र यासाठी स्वत: विविध फेस्टिवल्सना हजेरी लावण्याची गरज आहे. तसेच छोटय़ा छोटय़ा निर्मात्यांनी एकत्र येऊन त्यांचे चित्रपट गठ्ठय़ाने या वाहिन्यांच्या प्रतिनिधींना दाखवल्यास त्याचा खूप मोठा परिणाम होऊ शकतो. त्यासाठी केवळ प्रत्येक चित्रपटाचा सबटायटल्ससह प्रोमो त्या प्रतिनिधींना दाखवण्याची गरज आहे, असेही दीक्षित यांचे मत आहे.  
नाटकही फायद्यात नाहीच
मराठी व्यावसायिक नाटकांना पहिल्यांदा सातासमुद्रापार घेऊन जाणाऱ्या ‘सुयोग’च्या सुधीर भट यांच्या मते नाटकालाही परदेशात फार धंदा मिळत नाही. अमेरिकेत काही महत्त्वाच्या शहरांमध्ये २०-२५ हजार मराठी लोक आहेत. त्यापैकी २० टक्के जरी नाटकाला आली, तरी नाटक फायद्यात जाईल. मात्र चार महिने आधीपासून त्यांना तारखा देऊनही प्रेक्षक नाटकाकडे फिरकत नाहीत. मराठी चित्रपट परदेशात घेऊन जायचा असेल तर एखादा गट्स असलेला निर्माताच ते करू शकेल. मात्र सामान्यत: मराठी माणूस नाटकवेडा आहे, असे म्हणतात. त्यामुळे नाटकही परदेशात तोटय़ात असताना चित्रपट किती फायदा कमवेल, याबाबत मला शंका वाटते, असेही ते म्हणाले.