साहित्य आतून स्फुरत असते. एकदा साहित्य प्रतिभा जागविली की, ती प्रत्यक्षात उतरविल्याशिवाय राहवत नाही. माणसाचा असा अनुभव हेच खरे साहित्य असते. कवितेच्या बाबतीतही असच घडते. जेव्हा राहवत नाही, तेव्हा लिहिली जाते ती कविता असते, असे मत ज्येष्ठ साहित्यिक शंकर बडे यांनी व्यक्त केले.
दिग्रस येथे खापरखेडा येथील विद्युत अभियंता राम भोंडे ‘रॅम्प आणि भाकर’ व ‘रानझडी’ या दोन कवितासंग्रह व यवतमाळ येथील पत्रकार सुरेश गांजरे यांच्या मेंढर.. पालखी ‘ या एकांकिका संग्रहाच्या प्रकाशन सामारंभात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. जेष्ठ साहित्यिक, पत्रकार श्याम पेठकर, ज्येष्ठ लेखिका डॉ. शैलजा रानडे, रंगकर्मी व पत्रकार विनोद िबड, अमरावती विद्यापीठ सिनेट सदस्य विजय बंग, ए.एस. शेख, श्याम पाटील, डॉ. रविकिरण पंडित, प्रा. सुधीर पाठक, प्रमोद सूर्यवंशी आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
 यावेळी डॉ. शैलजा रानडे, सुरेश गांजरे व विनोद िबड यांनी तीनही पुस्तकावर भाष्य केले. लेखक राम भोंडे व सुरेश गांजरे तसेच शंकर भोसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
दिग्रस तालुका पत्रकार संघटना व नील प्रकाशनातर्फे आयोजित सदर कार्यक्रमात पत्रकारिता पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रावीण्य प्राप्त केल्याबद्दल तालुक्यातील विवेक राठोड व उमरखेड येथील सयद काजी यांना समाजकार्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचलन अमित चौहाण यांनी केले. प्रास्ताविक पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष मजहर अहमद खान तर उपस्थितांचे आभार निवृत्त मुख्याध्यापक उद्धव अंबुरे यांनी मानले.