नारेगावसह डंपिंग ग्राऊंड भोवतालच्या १४ गावांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा दावा करीत नारेगाव येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी महापालिकेच्या कचरा वाहून नेणाऱ्या गाडय़ांना कचरा टाकण्यास मज्जाव केला. शहरातून दररोज साडेचारशे टन कचरा नारेगावमध्ये टाकला जातो. सुमारे ३६ एकरावर गेल्या आठ वर्षांपासून कचरा तसाच पडून असल्याने प्रदूषणाचे विशेषत: पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असल्याने हे आंदोलन करावे लागले असल्याचे नगरसेवक मनीष दहीहंडे यांनी सांगितले. या आंदोलनामुळे कचऱ्याच्या गाडय़ा डंपिंग ग्राऊंडवरच लावण्यात आल्या. गाडय़ा रिकाम्या न झाल्याने उद्या कचरा उचलला जाणार का, हा प्रश्न अनुत्तरित आहे. सुमारे ६० वाहनांतून कचरा नेला जातो.
गेल्या कित्येक वर्षांपासून नारेगाव व परिसरातील कचरा उचलला गेला नाही. त्याची विल्हेवाटही नीटपणे लावली जात नाही. रबर, प्लास्टिकला आग लावली जाते. त्याचा मोठा धूर होतो. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचरा डेपोला लागूनच विमानतळ आहे. कचऱ्यात पडलेले खाद्यपदार्थ खाण्यासाठी मोठय़ा प्रमाणात पशु-पक्षी येतात. पक्ष्यांची संख्या वाढल्याने विमानाला धोका आहे. त्यामुळे न्यायालयानेही कचऱ्याच्या अनुषंगाने महापालिकेने कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्याचे पालन केले गेले नाही. या परिसरात किमान दोन हजार भटकी कुत्री आहेत. ते एवढे िहस्र आहे की, रात्रीच्या वेळी दुचाकीवरून चालत जाणेही मुश्किल होते. त्यामुळे कचरा डेपो हटवावा, अशी मागणी नारेगावच्या नागरिकांनी वारंवार केली. शुक्रवारी कचरा टाकू न देण्याचे आंदोलन सुरू करण्यात आले. गाडय़ा अडविण्यात आल्या. त्यामुळे आज त्या रिकाम्या होऊ शकल्या नाहीत. हे आंदोलन बेमुदत असेल, असे नगरसेवक दहीहंडे यांनी सांगितले.