एका फौजदारी प्रकरणात पोलीस आरोपीच्या अटकेसाठी गेले असता पोलिसांनी पतीला अटक करू नये म्हणून आरोपीच्या पत्नीनेच अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना तालुक्यातील किन्ही येथे घडली. या घटनेने पोलिसांमध्ये कमालीची दहशत निर्माण झाली आहे. पारू वसंता राठोड (४५,रा. किन्ही) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे.  
एका फौजदारी प्रकरणात तिचा पती वसंत राठोड याच्या अटकेसाठी यवतमाळ ग्रामीण ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार हे किन्ही येथे गेले होते. यावेळी पोलिसांना पाहून वसंता घरात दडला. मात्र, ही बाब पोलिसांच्या लक्षात आली. वसंताला  ताब्यात घेण्यासाठी पोलीस घरात शिरण्याचा प्रयत्न करीत होते. दरम्यान, पतीला अटक होऊ नये म्हणून पत्नी पारू घरातून रॉकेलची डबकी घेऊन आली. अंगावर रॉकेल घेऊन पतीला अटक कराल तर पेटवून घेईल, अशी धमकी तिने पोलीस पथकाला दिली. अनुचित घटना घडू नये या भावनेने पोलीस पथक वसंताला अटक न करताच आल्या पावली परतले. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक  जगदीश मंडलवार यांच्या तक्रारीवरून पारूविरुध्द आत्महत्येचा  प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.