नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात अलीकडेच अचानक दाटलेल्या गारव्याने सुखद धक्का मिळाला असला तरी दोन ते तीन दिवसातच थंडी गायब झाली आहे. मागील आठवडय़ाच्या तुलनेत तापमानात साडे सहा अंशांनी वाढ झाल्याने गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्याची मनिषा बाळगणाऱ्यांचा हिरमोड झाला आहे. रात्री काही भागात निर्माण होणारे ढगाळ वातावरण आणि उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग मंदावल्याने हवामानात हे बदल झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. हंगामाच्या प्रारंभीच दाखल झालेल्या गारव्याने आपले वेगळेपण अधोरेखीत केले असले तरी तापमानात चढ-उतार होण्याची श्रृंखलाही सुरू झाली आहे
दिवाळीनंतर काही दिवसात म्हणजे २० नोव्हेंबरला नाशिकच्या तापमानाने ८.० ही हंगामातील नीचांकी पातळी गाठली होती. पुढील दोन ते तीन दिवस तापमान काही अंशी या पातळीवर स्थिर होते. मात्र, २३ तारखेनंतर त्यात हळूहळू वाढ होऊ लागली. त्या दिवशी ११.४ असणारे किमान तापमान बुधवारी १४.५ अंशावर जाऊन पोहोचले. म्हणजे मागील आठवडय़ाच्या तुलनेत तापमानात ६.५ अंशांनी वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नोव्हेंबरमध्ये तापमानाने नीचांकी पातळी गाठली होती. गारव्याचे नेहमीपेक्षा लवकर आणि अधिक तीव्रतेने आगमन झाल्यामुळे सर्वसामान्यांना गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्याची संधी मिळाल्याचे वाटत असताना तापमान उंचावल्याने साऱ्यांचा भ्रमनिरास झाला.
सध्या रात्रीच्यावेळी अनेक भागात ढगाळ वातावरण आहे. जेव्हा नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील तापमानाने नीचांकी पातळी गाठली, तेव्हा आकाश निरभ्र होते. तसेच त्यावेळी उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग प्रतिताशी सहा किलोमीटर इतका होता. परंतु, सध्या हा वेग शून्यावर आला आहे. उत्तरेकडून वाहणारे वारे थांबल्याने आणि त्यात ढगाळ वातावरणाची भर पडल्याने तापमानात वाढ झाल्याचे हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे.
मागील चार ते पाच वर्षांतील नीचांकी पातळीचा आढावा घेतल्यास ही नोंद प्रामुख्याने जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात झालेली दिसते. यंदा नोव्हेंबरच्या मध्यावरच तापमानाने ही पातळी गाठल्यामुळे हंगाम संपुष्टात येईपर्यंत म्हणजे किमान दोन ते अडीच महिने हिवाळ्याचा आस्वाद घेता येईल, अशी स्थिती आहे. नाशिकप्रमाणे धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात असेच वातावरण राहिले. नोव्हेंबरच्या प्रारंभापासून नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील तापमानाचा पारा हळूहळू कमी होत होता. परंतु, नेहमी या पद्धतीने वातावरणात बदल होत असल्याने सर्वसामान्यांना त्यात फार काही विशेष असे वाटले नव्हते. परंतु, तापमानातील बदलामुळे हुडहुडी भरल्याची प्रचिती फार काळ टिकू शकली नाही. सर्वसामान्यांनी कपाटात बंद असणारे बाहेर काढलेले उबदार कपडेही पुन्हा कपाटबंद होऊ लागले आहेत.