विदर्भात गेल्या चार-पाच दिवसांपासून पारा चांगलाच घसरला असून या गारठय़ामुळे नागपूरकरांच्या अंगात हुडहुडी भरली आहे. गोंदिया व नागपूर चांगलेच गारठले आहे.
उपराजधानीत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळी राजकीय वातावरण चांगले तापले असताना थंडीने मात्र पळ काढला, तर डिसेंबरच्या शेवटी थंडीने उच्चांक गाठला होता, मात्र त्यानंतर काही दिवस थंडी कमी झाली होती, परंतु नववर्ष सुरू होत नाही तोच गेल्या चार-पाच दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. गेल्या चार दिवसात पारा अतिशय घसरला असून विदर्भात सर्वात कमी ७.४ अंश गोंदियात, तर नागपूरमध्ये ७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
विदर्भात डिसेंबरमध्ये सर्वात कमी तापमानाची (६.६) नोंद नागपूर शहरात करण्यात आली होती. विदर्भात आज अकोला ९.५, अमरावती ९.६ , ब्रम्हपुरी ११.२, चंद्रपूर १४.८, गोंदिया ७.४, नागपूर ७.६, वाशीम १०.८, वर्धा ९.५ यवतमाळ ८.६ नोंद करण्यात आली आहे.
आज सकाळपासून वाहणाऱ्या थंड  वाऱ्यामुळे चांगली हुडहुडी भरली असून अनेकजण उबदार कपडे घातल्याशिवाय घराबाहेर पडत नाही. गेल्या दोन दिवसांपासून शहरात सकाळी आणि रात्री थंडीचा कडाका जाणवत असून शहरातील विविध भागात शेकोटय़ा पेटू लागल्या आहेत. सोमवारी ढगाळ वातावरणामुळे नागपूरकरांना सूर्यदर्शन झाले नव्हते. त्याच थंडीमुळे नागपूरकर चांगलेच गारठले. सोमवारच्या तुलनेत आज सकाळपासून वाऱ्यामुळे अधिक थंडी जाणवायला लागली आहे.
सकाळपासून थंड वारे वाहू लागले आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगडसह विदर्भाच्या काही भागात थंडीची लाट कायम असून तापमान सरासरीपेक्षा खाली जात आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याचे सांगण्यात आले. हवामान खात्याच्या माहितीनुसार गेल्या २४ तासांपासून मध्य भारतात थंडीची लाट सुरू आहे.
सकाळपासून थंडीचा कडाका वाढत असताना कट्टय़ांवर बसणाऱ्यांनी दिवसाच शेकोटय़ा पेटवून उष्म्याचा आनंद घेतला. सकाळच्या वेळी काहीसे ढगाळ वातावरण आणि गार वाऱ्याने लोकांना हुडहुडी भरली होती, अशा वातावरणात गरमागरम चहाची मजा काही औरच असल्यामुळे शहरातील अनेक चहा टपऱ्यांवर गर्दी दिसून आली.
अचानक वाढलेल्या थंडीमुळे आजारांचे प्रमाणही वाढले आहे. शहरातील खाजगी आणि शासकीय रुग्णालयांत रुग्णांची गर्दी होते आहे. दम्याच्या आजारांबरोबरच तापाचे रुग्णही वाढले आहेत. त्यातच शहरातील विविध भागात असलेल्या अस्वच्छतेमुळे आरोग्याच्या समस्या आणखी वाढल्या आहेत. थंडीचा जोर वाढू लागल्याने ‘मॉर्निग वॉक ’ला जाणाऱ्यांच्या संख्येत घट झाली असून सकाळी शाळेत जाणाऱ्या मुलांनाही वाढत्या थंडीचा फ टका बसू लागला आहे.
रात्री ९ नंतर थंडीमुळे रस्त्यावरची वर्दळ कमी झाल्याचे दिसून       आले. उबदार कपडय़ांच्या     दुकानात ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे.