दिवाळीतच थंडीचे अस्तित्व जाणवू लागल्याने वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. सध्या तापमान १६ ते १९ अंशाच्या दरम्यान असून नाशिकसह उत्तर महाराष्ट्राची पावले गुलाबी थंडीच्या दिशेने पडू लागली आहेत. गारव्याची अनुभूती येत असल्याने सर्वसामान्यांना चांगलीच हुडहुडी भरू लागल्याचे चित्र आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, ऑक्टोबरपासून थंडीला सुरुवात झाल्यामुळे यंदा गारव्याची दीर्घकाळ अनुभूती मिळणार आहे.
कडक उन्हाळ्यानंतर पावसाचे आगमन काहीसे विलंबाने झाले. उशिरा आलेला पाऊस अखेरच्या सुमारास हवा तसा बरसला नाही. यामुळे यंदाची थंडी कशी असणार याबाबत सर्वसामान्यांकडून आडाखे बांधले जात होते. त्यामध्ये थंडीच्या तीव्रतेविषयी मत-मतांतरे व्यक्त झाली. एरवी, दिवाळीनंतर थंडीचे आगमन होते. यंदा काही दिवस आधीच तिचे अस्तित्व अधोरेखित होऊ लागले. २३ ऑक्टोबरला या महिन्यातील सर्वात कमी म्हणजे १६.३ अंश तापमानाची नोंद झाली. त्यानंतर तापमानाचा पारा हळूहळू उंचावून सोमवारी १९ अंशावर आला आहे. दरवर्षी थंडीचे आगमन चोर पावलांनी होते. म्हणजे, हळूहळू गारवा वाढत असल्याने एकदम थंडी जाणवत नाही. पण, या वर्षी तसे घडले नाही. ऑक्टोबर हीटमुळे उकाडा जाणवत असताना अचानक तापमान खाली घसरले. एकाच दिवसात गारवा जाणवू लागला. यामुळे नागरिकांनाही सुखद धक्का बसला. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निलोफर चक्रीवादळात रूपांतरित झाले. यामुळे वातावरण ढगाळ होऊन गारवा निर्माण झाल्याचे हवामानशास्त्र विभागाचे म्हणणे आहे. त्याचा प्रभाव उत्तर महाराष्ट्रातील वातावरणावर पडला आहे. थंडी दाखल झाल्यामुळे सर्वाना हुडहुडी भरली असून ऊबदार कपडे परिधान करण्यास सुरुवात झाली आहे. ऑक्टोबरपासून निर्माण झालेला गारवा पुढे कोणती पातळी गाठणार याबद्दल सर्वाना उत्सुकता आहे.
मागील आठ वर्षांतील थंडीचा आढावा घेतल्यास एखादा अपवादवगळता जानेवारी अथवा फेब्रुवारी महिन्यात तापमानाने निचांकी गाठल्याचे लक्षात येते. २००२ मध्ये २८ फेब्रुवारीच्या दिवशी नाशिकच्या तापमानाने ५ अंश या सर्वात कमी तापमानाची नोंद केली. त्या पुढील म्हणजे २००३ मध्ये तापमानाचा नूर जानेवारी महिन्यात पालटला होता. १ जानेवारी रोजी ५.४ अंश असे नीचांकी तापमान नोंदले गेले. त्यानंतर २००४ साली तापमान सर्वात कमी होण्यासाठी फेब्रुवारी महिना उजाडावा लागला. ६ फेब्रुवारी रोजी तापमान ८ अंशावर पोहचले. त्यापुढील २००५ मध्ये १९ जानेवारीला ६ अंश तर २००६ साली २६ जानेवारीला ६.६ अंश सेल्सियस नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. २००७ मध्ये २२ नोव्हेंबर रोजी ७.२ तर २००९ मध्ये ३१ डिसेंबर रोजी ७.८ या तापमानाची नोंद झाली. आठ वर्षांत कमी तापमान २००८ मध्ये ९ फेब्रुवारी रोजी ३.५ अंश इतके नोंदले गेले. नीचांकी तापमान आणि त्याचा दिवस पाहिल्यास तो एखादा अपवादवगळता उर्वरीत सर्व नवीन वर्षांतील पहिल्या अथवा दुसऱ्या महिन्यातील असल्याचे दिसते. २०१० मध्ये हंगामातील नीचांकी म्हणजे ५.४ अंशाची नोंद २१ डिसेंबरला झाली आहे. २०१२ मध्येही ही पातळी डिसेंबरच्या अखेरीस गाठली गेली. नीचांकी पातळी गाठण्यास बराच कालावधी असला तरी यंदा अधिक काळ गारव्याची अनुभूती मिळणार असल्याचे चित्र आहे.