राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील (एनआरएचएम) जिल्ह्य़ातील सुमारे ६०० कंत्राटी अधिकारी व कर्मचारी आजपासून सुरू करण्यात आलेल्या राज्यव्यापी ‘काम बंद’ आंदोलनात सहभागी झाले आहेत. दरम्यान आंदोलनात सहभागी झालेल्या कंत्राटी कर्मचा-यांना कमी करण्याचे आदेश अभियान संचालकांनी मुख्य कार्यकारी अधिका-यांना दिले आहेत.
‘एनआरएचम’ कर्मचा-यांच्या आंदोलनामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवेवर परिणाम होणार आहे. लसीकरण व प्राथमिक आरोग्य केंद्रात होणा-या महिलांच्या प्रसूती या सुविधांवर त्याचा तातडीने परिणाम होणार आहे. याशिवाय गर्भवती व गरोदर माता, अंगणवाडीतील बालके, शालेय विद्यार्थी यांच्या सुरू असलेल्या आरोग्य तपासणी मोहिमेस खीळ बसणार आहे. सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रातील आरोग्य सेवासुविधा आरोग्य विभागाच्या नियमित कर्मचा-यांपेक्षा एनआरएचएमच्या कंत्राटी कर्मचा-यांवरच अधिक अवलंबून आहे.
एनआरएचएम हा सध्याच्या आघाडी सरकारचा गेल्या सात वर्षांपासून राबवला जाणारा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. जिल्ह्य़ात सुमारे ६०० तर राज्यात सुमारे १८ हजार कंत्राटी कर्मचारी व अधिकारी आहेत. जिल्ह्य़ात त्यांची जिल्हास्तरावर केवळ २५ पदे आहेत तर ग्रामीण भागात सुमारे ५५० पदे आहेत. आरोग्य सेविका, आरोग्य सहायक, पर्यवेक्षिका, गटप्रवर्तक, डाटा एंट्री ऑपरेटर, औषध निर्माता, कनिष्ठ अभियंता, लेखापाल, जिल्हा कार्यक्रम व जिल्हा लेखा व्यवस्थापक अशी विविध पदे कार्यरत आहेत.
सेवेत कायम करावे, मानधनवाढ करावी, सेवापुस्तिकेसह रजा व इतर सुविधा मिळाव्यात आदी प्रमुख मागण्या असल्याचे कंत्राटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष किरण शिंदे, उपाध्यक्ष दत्ता धावणे, सचिव जी. बी. काळे आदींनी सांगितले. या मागण्यांचे निवेदन त्यांनी आज अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, सीईओ रुबल अग्रवाल, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. कारभारी खरात यांना दिले.
अभियान संचालकांनी दिलेल्या इशारा न जुमानता आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे, त्यासाठी उद्या (मंगळवार) जि. प. आवारात ठिय्या आंदोलन होणार आहे.