बेदरकार वाहन आणि रिक्षांचे चालक यांच्यामुळे बोरिवलीकरांसाठी मृत्यूचा सापळा बनलेल्या लिंक रोडच्या लोकमान्य टिळक चौकाजवळील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्याचे काम अखेर उच्च न्यायालयाचा दट्टय़ा पडल्यानंतर हाती घेण्यात आले आहे.लिंक रोडच्या डॉन बॉस्को शाळेसमोरील चौकात लिंक रोडच्या दोन्ही बाजूची तसेच समोरच्या चंदावरकर मार्ग, लोकमान्य टिळक मार्ग आणि गोराईकडून येणारी वाहने एकत्र येतात. परंतु, येथे वाहतुकीची शिस्त नावालाही आढळत नाही. रिक्षाचालक, वाहनचालक, दुचाकीस्वार यांच्यात जणू नियम तोडण्याबाबत स्पर्धाच लागलेली असते. स्वाभाविकच या चौकात अपघाताचे प्रमाण खूप मोठे आहे. या चौकाच्या जवळच शाळा आहे. पण, त्याचीही पर्वा वाहन पिटाळणारे ठेवत नाही, अशी तक्रार स्थानिक नेते विपुल जोशी यांनी केली. अशा मनमानी चालकांमुळे आबालवृद्धांना रस्ता ओलांडणे हा जीवाशी खेळ ठरतो. खड्डय़ांची पर्वा न करता वायुवेगाने पिटाळण्यात आल्याने येथे रिक्षा उलटण्याचा प्रकार वरचेवर होतो. या सर्व गलथानपणाविरोधात येथील रहिवाशी अ‍ॅड.रचना चव्हाण यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर न्यायालयाने या चौकाजवळील परिस्थितीचा आढावा घेऊन सुधारणा सुचविण्यासाठी अ‍ॅड. नरोला यांची समिती नेमली होती. ‘या समितीने येथील वाहतूक सुधारणेबाबतचा अहवाल न्यायालयाला सादर केला. न्यायालयाने या शिफारसींनुसार बदल करण्याचे आदेश दिल्याने हे काम हाती घेण्यात आले आहे. या बदलांमुळे या चौकाजवळील वाहतुकीला शिस्त आणण्याचा प्रयत्न आहे,’ असे पालिकेच्या उत्तर-मध्य प्रभागाचे पालिका अधिकारी व्ही. जी. बोले यांनी सांगितले.
होणारे बदल
* येथील सिग्नलची संख्या चारवरून सहा  करण्यात येणार आहे.
* सिग्नल दुरूनही दिसावे यासाठी कॅनॉपी पद्धतीचे लावण्यात येणार आहेत. कारण, आधी सिग्नलबाबत गोंधळ असल्याने त्याचे कारण देत चालक आपले वाहन कसेही हाकत. पण, आता ही सबब चालकांना पुढे करून चालणार नाही.
* चौकाच्या मध्यावर चौथऱ्यावर उभारण्यात आलेले लोकमान्य टिळकांचे स्मारकही बाजूला हलविण्यात येणार आहे. हे स्मारक डॉन बॉस्कोच्या समोरच एका त्रिकोणी आकाराचा मोठय़ा चौथऱ्यावर हलविण्यात येणार आहे. या चौथऱ्याच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.
* चंदावरकर मार्गावर दुभाजक टाकले जाणार
* टिळक मार्गावरील बसचा थांबा मागे हलविणार
उड्डाणपुलाचाही प्रस्ताव पण..
गोंधळ टाळण्यासाठी लिंक रोडवर उड्डाणपूल बांधण्यात यावा, अशी शिफारस येथील स्थानिक नगरसेविका संध्या जोशी यांनी केली आहे. त्यासाठी प्रभाग समितीच्या अर्थसंकल्पात २० कोटींची तरतूद करण्यात यावी, असा हा प्रस्ताव आहे. या उड्डाणपुलाच्या गरजेला उत्तर-मध्य प्रभागाचे अधिकारी बोले यांनीही दुजोरा दिला. परंतु, नरोला समितीच्या शिफारसींमध्ये उड्डाणपुलाची शिफारस नाही. या ठिकाणी वाहतुक पोलिसांना बंदोबस्त ठेवला तरी परिस्थिती सुधारेल. मग उड्डाणपुलाचा घाट कशासाठी घालायचा असा प्रश्न आहे.