विदर्भ आणि मराठवाडय़ात दुष्काळाची स्थिती असून शेतकऱ्यांची अत्यंत वाईट अवस्था आहे. त्यामुळे जोपर्यंत शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची घोषणा केली जात नाही, तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू दिले जाणार नाही, असा इशारा काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे उपनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला.
वडेट्टीवार यांनी शुक्रवारी लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. फडणवीस सत्तेत येऊन एक महिना होत नाही तोच ११८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हे सुशासन आहे काय? असा सवालही त्यांनी केला. राज्यात आत्महत्या सुरू असताना मुख्यमंत्री वेगळ्याचा कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या दुष्काळाचे गांभीर्य नाही, असा आरोपही त्यांनी केला.
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये मदत देण्यात यावी आणि त्यांच्या कुटुंबाचे संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावे, अशी मागणी लावून धरण्यात येईल. या शिवाय कोरडवाहू शेतकऱ्याला प्रतिहेक्टरी २५ हजार, बागायती शेतकऱ्याला ५० हजारांची मदत देण्यात आली पाहिजे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केली जात नाही, तोपर्यंत विधिमंडळाचे कामकाज चालू दिले जाणार नाही, असेही ते म्हणाले.
भाजपने निवडणुकीत दिलेले वेगळ्या विदर्भात आश्वासन पूर्ण करावे, यासाठी अशासकीय ठराव मांडला आहे. या सरकारचे दाखवायचे एक खायचे वेगळे दात आहेत. युती सरकारच्या काळात १७ टक्के व्याजाने कर्ज घेण्यात आले होते. काँग्रेस सत्तेत आले तेव्हा ४५ हजार कोटींचे कर्ज राज्यावर होते. त्यावरील व्याजाचा विचार केल्यास आज जे राज्यावर ३ लाख कोटींचे कर्ज आहे ते या सरकारचेच पाप आहे, असेही ते म्हणाले.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अडचणी आणण्याची काँग्रेसची रणनीती असल्याचे वडेट्टीवार यांनी संकेत दिले. आधीच्या सरकारने सिंचन घोटाळ्यासंदर्भात श्वेतपत्रिका काढली होती. त्या श्वेतपत्रिकेत दोषी आढळलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस करणार आहे. काँग्रेसचे ४२ आमदार आहेत. सत्तेतील पक्षानंतर सर्वाधिक संख्याबळ असलेला विरोधी पक्ष असतो. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षांना भेटून आपल्या सदस्य संख्येची माहिती देऊ आणि विरोधी पक्षाचा दर्जा देण्याची मागणी करू. ते मान्य न केल्यास न्यायालयात जाण्याचा पर्याय आहे, असेही ते म्हणाले.