राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने ५० वर्षांच्या संघर्षमय इतिहासात अनेक कर्मचाऱ्यांचे भविष्य घडवले. कर्मचाऱ्यांच्या त्यागातून संघटना पुढे आली. कर्मचाऱ्यांनी काम करताना समाजाप्रती मानसिकता सकारात्मक ठेवून प्रसंगी रोष स्वीकारून आपली जबाबदारी पूर्ण केली पाहिजे. यासाठी कर्मचाऱ्यांनी स्वत:ची प्रतिमा शुद्ध ठेवावी, असे मत ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. पद्माकर हसेगावकर यांनी व्यक्त केले.
राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जिल्ह्य़ातील माजी अध्यक्षांचा सत्कार केला.
 या वेळी अ‍ॅड. पद्माकर हसेगावकर, शहापुरे, शिक्षक नेते द. बा. घुमरे, संघटनेचे नवनाथ नागरगोजे, चंद्रकांत जोगदंड, राजकुमार कदम आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना अ‍ॅड. हसेगावकर म्हणाले, की पूर्वी कर्मचाऱ्यांची मानसिकता अत्यंत भित्री होती. सन १९६६ मध्ये संघटनेचे नेतृत्व काही काळ आपल्याकडे होते. र. घ. कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली संघटना मजबूत झाली. संघटनेने कर्मचाऱ्यांचे भविष्य घडवले असेही हसेगावकार यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांनी समाजाप्रती मानसिकता बदलली पाहिजे. जबाबदारीची जाणीव ठेवून स्वत:ची प्रतिमा शुद्ध ठेवली, तर प्रशासकीय यंत्रणेवरील सर्वसामान्यांचा विश्वास अधिक मजबूत होईल असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
शहापुरे यांनी अध्यक्ष असताना ५४ दिवसांचा ऐतिहासिक संप यशस्वी केला, असे सांगून कर्णिक यांच्या नेतृत्वामुळे संघटनेला बळ मिळाले. कर्णिक यांच्यासारखा खर्डा वक्ता, कुशल नेतृत्व मिळाल्यामुळेच संघटना यशस्वी होऊ शकली, असे नमूद केले. संघटनेच्या एकजुटीवर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न सरकारकडून मार्गी लावण्यात यश मिळाले. द. बा. घुमरे यांनी सांगितले, की कर्मचाऱ्यांनी संघटित झाल्याशिवाय प्रश्न सुटू शकत नाहीत. याप्रसंगी संघटनेचे बी. डी. लोणकर, वैजनाथ ससाणे, बी. जी. तांदळे, पांडुरंग गोरकर, गणेश आजबे आदी उपस्थित होते.