वकिली व्यवसायात कौशल्य वाढीसाठी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा यांच्या वतीने व्यवसायात नव्याने पदार्पण करणाऱ्या वकिलांकरिता गिरणारे येथे आयोजित दोनदिवसीय निवासी कार्यशाळेत ‘वकिली व्यवसायातील कौशल्य विकास’ या विषयावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
बार असोसिएशन नाशिक आणि अ‍ॅड. अभय गोसावी फाऊंडेशन यांच्या सहकार्याने ‘क्लिप’ ही नुकतीच झाली. नवोदित वकिलांमध्ये व्यावसायिक गुणवत्ता यावी तसेच न्यायालयीन कामकाजात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान द्यावे आणि चांगले वकील व न्यायाधीश घडावेत, या उद्देशाने अशा प्रकारच्या कार्यशाळा संपूर्ण महाराष्ट्रात आयोजित करण्याचा उपक्रम बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा यांनी सुरू केला आहे. त्यामुळे स्थानिक वकिलांना त्यामध्ये सहभाग घेऊन आपली व्यावसायिक गुणवत्ता वाढविण्यास मदत मिळते. कार्यशाळेमध्ये न्यायालयीन कामकाजाबरोबरच व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर मार्गदर्शन केले जात असल्याची माहिती बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे माजी अध्यक्ष जयंत जायभावे यांनी दिली. या दोनदिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन नाशिक जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एस. फालके यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे अध्यक्ष अ‍ॅड. अविनाश भिडे यांनी भूषविले. कार्यशाळेत उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आर. वाय. गानू, न्या. फालके, न्या. आर. आर. कदम आदींनी दिवाणी व फौजदारी न्यायालयीन कामकाज, कौटुंबिक न्यायालयातील कामकाज, वैकल्पिक वाद निवारण पद्धतीचे न्यायदान प्रक्रियेतील महत्त्व, मिळकतीचे दस्तऐवज तयार करताना घ्यावयाची काळजी तसेच राजेश गुरळे व मेजर कृष्णा खोत यांनी व्यावसायिक गुणवत्ता व ध्येय कसे गाठावे, स्वयंशिस्तीचे फायदे व व्यवसाय वाढीसाठी आवश्यक किमान कौशल्य याविषयी मार्गदर्शन केले. अ‍ॅड. गोरक्ष नवले यांनी योगासन वर्ग घेऊन ‘योगाचे आरोग्यपूर्ण जीवनासाठी महत्त्व’ या विषयावर सहभागी वकिलांना माहिती दिली.
कार्यशाळेच्या माध्यमातून नवोदित वकिलांची व्यावसायिक गुणवत्ता वाढीस लागेल, असा विश्वास उपस्थित वकिलांनी व्यक्त केला. नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष नितीन ठाकरे यांनी असोसिएशनच्या माध्यमातून विविध कायदेशीर विषयांवर व्याख्यानमाला व कार्यशाळा सुरू करण्याची घोषणा केली. कार्यशाळेच्या समारोपास प्रमुख पाहुणे म्हणून बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे उपाध्यक्ष अहमदनगर येथील अशोक पाटील उपस्थित होते. या नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी नवोदित वकिलांतर्फे अ‍ॅड. जयंत जायभावे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वितेसाठी मुख्य संयोजक म्हणून शशिकांत दळवी, दीपक ढिकले, माणिक बोडके, चंद्रकांत खुळे, मयूरी सोनवणे, मनीषा जाधव आदी वकिलांनी परिश्रम घेतले.