मंगळवारी रात्री त्रिवेंद्रम -कोरबा एक्सप्रेसमध्ये चोरटय़ांनी १ कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. चोरटय़ांनी ए-१, बी-१, एस-४, एस-९ या कोचमध्ये गाढ झोपेत असलेल्या ३०-३५ प्रवाशांचे दागिने, किमती साहित्य, कपडे असा एकूण १ कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
विजयवाडा रेल्वे स्थानकावर सकाळी प्रवासी झोपेतून जागे झाल्यावर त्यांना आपले संपूर्ण साहित्य चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यामुळे एकच खळबळ माजली. ही गाडी नागपूर रेल्वे स्थानकावर जवळपास दीड तास उशिरा पोहोचली. प्रवाशांनी गोंधळ घालू नये यासाठी नागपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दल, लोहमार्ग आणि पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला. चोरटय़ांनी कोणतातरी स्प्रे मारून  ही लुटमार केली, अशी माहिती प्रवाशांनी दिली. मद्रास रेल्वे स्थानकावरून त्रिवेंद्रम- कोरबा एक्सप्रेस ही गाडी रात्री ११.१५ वाजता सुटली. त्यावेळी प्रवाशांचे सर्व साहित्य जसेच्या तसे होते. परंतु ए-१, बी-१ या कोचमध्ये ३० ते ४० वेटिंगवर असलेले प्रवासी बसून होते. काही प्रवाशांना शंका आल्यामुळे टीसीला त्यांना बाहेर काढण्याची मागणी केली. मात्र, गाडीतील टीसीने तुम्हाला काय करायचे असे सुनावले. प्रवासी झोपल्यानंतर रात्रभर चोरटय़ांनी ३५-४० प्रवाशांचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, लॅपटॉप, भारी किमतीचे मोबाईल असा एकूण १ कोटी रुपयांचा ऐवज लंपास केला. विजयवाडा रेल्वे स्थानकावर ही गाडी सकाळी ६ वाजता आल्यावर आपले सामान चोरीला गेल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले आणि एकच खळबळ माजली. त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक रेल्वे स्थानकात तक्रार करण्यात आली, नागपूर रेल्वे स्थानकावर ही गाडी दुपारी ४.४० वाजता येते; परंतु या घटनेमुळे दीड तास उशिरा म्हणजे सायंकाळी ६ वाजता फलाट क्र. ६ वर पोहचली.
प्रवाशांनी गडबड करू नये यासाठी रेल्वे सुरक्षा दलाचे सहायक सुरक्षा आयुक्त चौधरी, निरीक्षक कल्याण मोरे, आर.एन. सिंग, लोहमार्ग पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात आला. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी पोलीस रेल्वे सुरक्षादलाच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली.      
वेटिंग प्रवाशांना बाहेर काढण्याची मागणी प्रवाशांनी टीटीईला केली. परंतु टीटीईने दमदाटी केली. त्यामुळे गाडीतील सर्व कर्मचारी चोरटय़ांनी मॅनेज केले असावे, असा आरोप प्रवाशांनी केला आहे. त्याचप्रमाणे आरक्षित डब्यात लुटमार सुरू असताना खम्मम येथून चढलेल्या तृतीयपंथीयांच्या समूहाने प्रवाशांना वेठीस धरले. त्यांनी जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशातून नोटा काढल्या. पुढील स्थानकावर ते उतरले आणि तेथून आणखी काही तृतीयपंथी चढले त्यांनीसुद्धा प्रवाशांना वेठीस धरले, अशी तक्रार प्रवाशांनी केली.

दागिने प्रमुख लक्ष्य
या गाडीतील ए-१ कोचमध्ये बर्थ २७, २८ वर प्रवास करणारे भिलाई येथील टेटस टोनी (४०) यांनी आपले ५ लाखाचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचे सांगितले. रामचंद्र मुदलियार (५३) हे एस-९ कोचमधून बर्थ क्र. ५०, ५२ वरून प्रवास करत होते. त्यांच्या पत्नीचे सोन्याचे नेकलेस, मंगळसूत्र, कानातले आणि १.६५ लाख रुपये रक्कम आणि मुलाच्या शिक्षणासाठी काढलेला १.५५ लाखाचा डिमांड ड्राफ्ट असा एकूण ४ लाखाचा मुद्देमाल चोरटय़ांनी लंपास केला. तसेच बी-१ कोचच्या बर्थक्रम. ५८, ५९, ६१, ६७ यावरून प्रवास करणारे के. संतोषकुमार यांचेही १.५० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ७ लाखाचा मुद्देमाल चोरटय़ांनी पळविला.