मिळकतकरासह पाणीपट्टी आणि अन्य थकबाकी वर्षांनुवर्षे वसूल होत नसल्यामुळे यातील काही रक्कम माफ करण्याच्या आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयाला विरोध करण्यात आला असून, असे धोरण स्वीकारल्यास प्रामाणिक करदात्यांपर्यंत चुकीचा संदेश जाईल, असे विरोधकांचे म्हणणे आहे.
महापालिकेचे सन २०१३-१४चे अंदाजपत्रक सादर करताना मंगळवारी आयुक्तांनी थकीत कर किती वर्षे अंदाजपत्रकात दाखवायचा, तो वसूल होत नसल्यामुळे वर्षांनुवर्षे फक्त येणे रक्कम दिसत राहते. प्रत्यक्षात या रकमा वसूल होत नाहीत. तसेच त्यासंबंधीच्या न्यायालयीन लवादापुढेही त्या थकबाकीचे समाधानकारक स्पष्टीकरण महापालिका देऊ शकत नाही. त्यामुळे मिळकतकराची तसेच पाणीपट्टीची थकबाकी काही प्रमाणात माफ करावी लागेल, असे सूतोवाच केले.
आयुक्तांच्या या भूमिकेला विरोध असल्याचे सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर यांनी बुधवारी सांगितले. वसुली शक्य होत नसल्यामुळे ती माफ करणे ही चुकीची कार्यपद्धती असून, असा निर्णय झाल्यास प्रामाणिक करदात्यांना चुकीचा संदेश जाईल. मुळातच, प्रशासन थकबाकी वसुली करू शकत नाही, ही प्रशासनाची अकार्यक्षमता आहे. त्याचा भार प्रामाणिक करदात्यांनी का सोसायचा, असा प्रश्न संघटनेने विचारला आहे.