‘संगीत सुरू झाले की माझे पाय आपसूक थिरकायला लागतात. नृत्य माझा श्वास आहे. मला डान्स टिचर व्हायचे आहे. पण हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी माझे शरीर साथ देईल काय ?’ हा केविलवाणा प्रश्न आहे एचआयव्ही बाधित प्रमोदचा. (नाव बदललेले आहे) पुरोगामी म्हणविणाऱ्या भारतात पुढारलेपणाचा आव आणला तरी अद्यापही एचआयव्ही बाधितांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदललेला नाही. मोठय़ा व्यक्तींना या आजाराची, तो कशामुळे झाला, याची जाणीव असत. मात्र कोणतीही चूक नसताना आईवडिलांकडून जन्मत आलेल्या एचआयव्हीविषयी मुलांनी दाद मागायची तरी कोणाकडे, हा प्रश्न आजही कायम आहे. यश फाऊंडेशनच्या माध्यमातून एचआयव्हीबाधित मुलामुलींसाठी वेगळी वाट शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. फाऊंडेशनच्या वतीने एरवी बालदिनी होणारा विशेष कार्यक्रम यंदा दिवाळीमुळे १७ नोव्हेंबर रोजी संस्थेच्या आवारात होणार असल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी दिली.
महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा आणि यश फाऊंडेशन यांच्या वतीने २००७ पासून शहरात एचआयव्ही बाधितांसह एड्स रुग्णांसाठी काम सुरू करण्यात आले. एचआयव्ही आणि एड्सविषयी प्रबोधन होत असताना त्या संबंधित रुग्णांचे पुनर्वसन होणे गरजेचे आहे, हे संस्थेच्या लक्षात आले. विशेषत लहान मुलांमध्ये निर्माण होणारा न्यूनगंड, आजाराविषयी असणारी अपूर्ण माहिती, यामुळे या आजाराला बळी पडणाऱ्यांची संख्या अधिक आहे. हा धोका लक्षात घेऊन संस्थेने सुरूवातीला १५ मुलांना दत्तक घेतले. त्यांना सकस आहाराचे वाटप करण्यास सुरूवात केली. आज हा आकडा १५० पर्यंत जावून पोहोचला आहे. प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी संस्थेच्या वतीने सकस आहाराच्या वाटपासोबत शारीरिक तपासणी, शालेय साहित्याचे वाटप केले जाते. या कालावधीत मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी त्यांच्याकरीता खास मनोरंजनात्मक कार्यक्रमांच्या आयोजनासह विविध ठिकाणी सहली काढण्यात येतात. या उपक्रमात सहभागी होणारी सीमा तिचा अनुभव सांगताना म्हणते, ‘मला आजाराबद्दल २००७ मध्ये समजले. मी लहान असल्यामुळे मला याविषयी काहीच समजत नव्हते. आईच्या डोळ्यांतील आसू पाहून आपल्याला नक्की काही तरी मोठा आजार झाला, हे माझ्या मनाने पक्के केले. मी घाबरली, रडली, आदळआपट केली. यानंतर आईने मला आजाराची संपूर्ण माहिती दिली. आपल्याकडून हा आजार कोणाला होऊ नये, यासाठी काय काळजी घ्यावी याचीही माहिती दिली. यामुळे मला काही जखम झाली तर मी इतरांपासून स्वतला दूर ठेवते. नियमितपणे औषधोपचारासह व्यायाम करते. आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला अधिकारी व्हायचे आहे. पण आजही आपल्यामुळे मुलीला हा आजार झाला याचे दु:ख आईच्या डोळ्यांत दिसते. माझ्या परीने मी तिला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते. या प्रयत्नात देव आणि माझं शरीर मला साथ देईल की नाही, हा प्रश्न मला सतावतो..’
प्रमोदही त्याच्याबद्दल सांगताना गहिवरून जातो. ‘मला माझ्या आजाराबद्दल २००४ मध्ये कळाले. न्युमोनिया झाल्यामुळे मला दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. तेव्हा काही तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये मी एचआयव्ही बाधीत असल्याचे निष्पन्न झाले. मी लहान असल्यामुळे मला ते कळलेच नाही, परंतु जे माझ्या जवळचे होते, त्यांनीही याबाबत मला जाणीव करून दिली नाही. सर्वच आपुलकीने माझी काळजी घेतात. सध्या मी नववीत आहे. मला डान्स टिचर व्हायचे आहे. मला जगण्याचा पुरेपूर आनंद घ्यायचा आहे. मोठ्ठा झाल्यावर मी आईला कारमधून फिरविणार आहे. मला जरी आजार असला तरी या आजारामुळे मी माझ्या कोणत्याही इच्छा अपूर्ण ठेवणार नाही. पण मनात कुठेतरी भीती वाटते..हे सर्व पूर्ण होईल का?’ अशा असंख्य प्रश्नांना सामोरे जात सभोवताली अनेक निरागस चेहरे आपल्याभोवती फिरत आहे. संस्था अशा मुलांच्या आरोग्य, आहार व शिक्षण याकडे लक्ष देत आहे. मुलांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी संस्थेच्या वतीने होळी, दिवाळी, दसरा, बालदिन, ख्रिसमस असे विविध उत्सव साजरे होतात. या मुलांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. अलीकडेच संस्थेच्या वतीने १०-१२ सायकली जमा करण्यात आल्या. संस्थेच्या आवारात मुलांना सहज जाता येता यावे, यासाठी सायकलींचे वाटप १७ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. तसेच बालदिनानिमित्त मुलांना खाऊ, चॉकलेट्स वाटपासह त्यांच्यासाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात अधिक
माहितीसाठी रवींद्र पाटील (९८५०८३५०९६, ९२२५८१७६२७) यांच्याशी संपर्क साधावा.     
नाशिक येथे २००७ पासून एचआयव्ही बाधितांसह एड्सग्रस्त रूग्णांसाठी महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा आणि यश फाऊंडेशन यांच्या वतीने काम केले जात आहे. आई-वडिलांकडून जन्मत: हा आजार मिळालेल्या मुलांसाठीही फाऊंडेशनच्या वतीने विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत. १४ नोव्हेंबर या बालदिनानिमित्त त्याविषयी थोडसं..