प्रायोगिक-व्यावसायिक रंगभूमीबरोबरच चित्रपट दिग्दर्शनातही चंद्रकांत कुलकर्णी यांनी आपला असा ठसा उमटविला आहे. ‘पिपाणी’ या चित्रपटातील कामाद्वारे आपण उत्तम अभिनयही करू शकतो, हेदेखील त्यांनी सिद्ध केले आहे. त्याचप्रमाणे सध्या नाटय़ परिषदेच्या निवडणुकीतही ते निवडून आले. नाटक, चित्रपट, नाटय़ परिषदेच्या निवडणुकीचे राजकारण अशा विविध विषयांसह त्यांच्या आगामी ‘आजचा दिवस माझा’ या चित्रपटाबाबत त्यांनी ‘रविवार वृत्तान्त’शी मनमोकळ्या गप्पा मारल्या..
०   ‘आजचा दिवस माझा’ या चित्रपटाचा नेमका विषय काय? हा चित्रपट नोकरशाही आणि राजकारणी यांच्यातील संघर्षांवर आधारित आहे का?
– चित्रपटाची संकल्पना एका वाक्यात सांगायची, तर राजकीय पाश्र्वभूमी असलेली माणुसकीची गोष्ट! आतापर्यंत राजकारणावर आधारित चित्रपटांमध्ये राजकारणाचे डावपेच, सत्ताधारी आणि विरोधक यांचा सत्तेसाठी चाललेला संघर्ष वगैरेंचे चित्रण आले आहे. मात्र ‘आजचा दिवस माझा’ या चित्रपटातील राजकारणीच ‘प्रोटागॉनिस्ट’ आहे. तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. त्याच्या आयुष्यातील एका दिवसातील घडामोडींवर हा चित्रपट बेतलेला आहे. यात नोकरशाही आणि राजकारणी यांच्यातील लढा तर आहेच. पण हा लढा सत्तेसाठी नाही. चित्रपटात काळ्या किंवा पांढऱ्या अशा व्यक्तिरेखा नाहीत. या चित्रपटाद्वारे आपण राजकारण्यांमध्ये दडलेला माणूस दाखवण्याचाही प्रयत्न केला आहे. यशवंतराव चव्हाण यांचे एक अतिशय उत्तम वाक्य आहे, ‘राज्यकर्त्यांनी ‘नाही’ म्हणायला आणि प्रशासकांनी ‘हो’ म्हणायला शिकले पाहिजे.’ हाच नेमका आमच्या चित्रपटाचा गाभा आहे.
०   चित्रपटाची मांडणी नेमकी कशी केली आहे?
– दर दिवशी मंत्रालयातील प्रसिद्धी अधिकाऱ्यांकडून आणि मुख्यमंत्र्यांच्या प्रसिद्धी अधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांचे वेळापत्रक प्रसिद्ध होत असते. या वेळापत्रकात संपूर्ण दिवसभरात मुख्यमंत्री कोणकोणत्या कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत, याची अगदी इत्थंभूत माहिती असते. त्यात मुख्यमंत्र्यांच्या दिवसातील मिनिटा-मिनिटाचा हिशेब असतो. मुख्यमंत्र्यांच्या वेळापत्रकात असलेला हा वेग आमच्या पटकथेत आहे. पटकथेचा कालावधी दीड दिवसांचा आहे. तसेच चित्रपटात अनेक घटनास्थळेही आहेत. एका दुपारी मुख्यमंत्री विमानतळावर उतरतात आणि पुढे चित्रपट सुरू होतो. त्यामुळे अत्यंत वेगवान पद्धतीने पटकथेची आणि पर्यायाने चित्रपटाची मांडणी केली आहे. गरज असेल तेव्हा राजकीय नेतृत्वाची कसोटी कशी लागते, हे यातून दाखवायचे आहे.
०   ‘शिवाजीराजे भोसले..’नंतर महेश मांजरेकर आणि सचिन खेडेकर पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. या दोघांना डोळ्यांसमोर ठेवूनच चित्रपटाची पटकथा लिहिली का?
– अजिबात नाही. चित्रपटाची पटकथा प्रशांत आणि अजित दळवी यांनी तयार केली. साधारणपणे कोणत्याही चित्रपटाची पटकथा वाचतानाच माझ्या डोक्यात दृश्ये तयार होतात. त्या पटकथेतील भूमिकांसाठी योग्य माणसे दिसायला लागतात. आतापर्यंत तरी माझ्या डोक्यात आलेल्या कलाकाराने मला नकार दिलेला नाही. ही पटकथा वाचतानाही माझ्या डोक्यात सचिन आणि महेश याच दोघांची नावे आली. सचिनसह मी खूप काम केले आहे. व्यावसायिक, प्रायोगिक नाटके, हिंदी नाटके, चित्रपट अशा सर्वच माध्यमांमध्ये आम्ही एकत्र काम केले असल्याने आम्हाला दोघांनाही एकमेकांची कार्यपद्धती माहिती आहे. तर महेश व मी गेली २५ वर्षे एकमेकांचे मित्र आहोत. आमच्या दोघांचे टय़ुनिंगही खूप वेगळ्याच पातळीवरील आहे. एक आयएएस अधिकारी जसा असायला हवा, तसा महेशने उभा केला आहे. त्याशिवाय हृषिकेश जोशीनेही खूप अप्रतिम काम केले आहे.
०   चित्रपटाच्या पटकथेवर किंवा मांडणीवर अरुण साधू यांच्या कादंबऱ्यांचा प्रभाव कितपत आहे?
– थेट प्रभाव अजिबातच नाही. साधूंच्या कादंबऱ्यांपेक्षाही त्यात मला स्वत:ला आलेले अनुभवही आहेत. मीदेखील काही वर्षे पत्रकारितेत काढली आहेत. त्यानिमित्ताने मंत्रालयात येणे-जाणेही होते. ते सर्वच वातावरण मी जवळून पाहिले आहे. त्याचा उपयोग मला चित्रपटाची मांडणी करताना झाला.
०   गेल्या वर्षी यशस्वी झालेल्या ‘तुकाराम’ आणि ‘काकस्पर्श’ या दोन्ही चित्रपटांतील कलाकार या चित्रपटात एकत्र आले आहेत. त्याबद्दल काय सांगाल?
– खरेच, हे दोन्ही गेल्या वर्षीचे खूप महत्त्वाचे आणि काही मोजक्या यशस्वी चित्रपटांपैकी दोन चित्रपट होते. ‘आजचा दिवस माझा’च्या निमित्ताने या दोन्ही चित्रपटांतील सृजनशील कलाकार एकत्र आले आहेत. अशी घुसळण सांस्कृतिक क्षेत्रासाठी खूप चांगली असते. आणि राजकारणापेक्षा सांस्कृतिक क्षेत्रातील युती जास्त लाभदायक ठरू शकते.
०   ‘तुकाराम’सारख्या पिरियॉडिक चित्रपटानंतर अगदी आधुनिक अशा ‘आजचा दिवस माझा’वर उडी घ्यावीशी का वाटली?
– माझ्या चित्रपटांचा आलेख बघितला तर मी दरवेळी नावीन्यपूर्ण विषयांवरच काम केले आहे. आतापर्यंत एकासारखा दुसरा चित्रपट कधीच बनवलेला नाही. या नवनवीन विषयांमधून मलाही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. यशस्वी चित्रपटाचा एक फॉम्र्युला सहज निर्माण होऊ शकतो. पण त्यात मजा नाही. त्यापेक्षा सतत आव्हानात्मक विषय हाताळणे मला जास्त आवडते. तसेच काम करताना प्रेक्षकांच्या अभिरुचीचा विचार करणेही महत्त्वाचे आहे. आपल्या कलाकृतीतून त्यांनाही काही तरी नवीन मिळाले पाहिजे. बरे, हे करत असताना गुणवत्तेतही तडजोड करून चालत नाही. प्रेक्षकांची विश्वासार्हता जपूनच काम करावे लागते. त्या दृष्टीने मला हा विषय खूप चांगला वाटला.
०   काही दिवसांपूर्वी तुम्ही म्हणाला होतात की, आम्ही दिग्दर्शकांनीच एकमेकांना आमच्या चित्रपटांत  अभिनयाची संधी द्यायला हवी. महेश मांजरेकर यांची निवड करण्यामागेही असाच काही विचार होता का?
– मनापासून उत्तर द्यायचे, तर ते विधान मी गंमत म्हणूनच केले होते. शेवटी आम्हा दिग्दर्शकांमध्येही एक नट दडलेला आहे. कधीकाळी आम्हीही रंगभूमीवर ग्रीज पेंट लावून उभे राहिलो आहोतच. त्यामुळे ‘पिपाणी’मध्ये गजेंद्रने मला संधी दिली, ती काही मी दिग्दर्शक आहे म्हणून नाही, तर त्याच्या मते मी त्या भूमिकेला योग्य न्याय देऊ शकत होतो म्हणून. महेशच्या बाबतीत सांगायचे झाले तर, महेश स्वत: खूप चांगला अभिनेता आहे. आता महेशला मी घेतले म्हणजे तोदेखील मला घेईलच, हा मुद्दा निराळा!!! विनोद बाजूला ठेवा, पण भूमिकेसाठी चेहरा आणि व्यक्ती चोख असणे महत्त्वाचे आहे.
०   तुम्ही प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर सक्रिय राहिला आहात. सध्या एखादे नवीन नाटक वगैरे करत आहात का?
– यंदा मला मुंबईत येऊन २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. २५ वर्षांपूर्वी पत्रकारितेच्या निमित्ताने पहिल्यांदा मुंबईत आलो आणि मग प्रायोगिक, व्यावसायिक रंगभूमी, मालिका, चित्रपट असे करत स्थिरावलो. या सर्वच काळात नाटकांनी मला खूप काही दिले आहे. ते ऋण न फेडता येण्यासारखे आहे. यंदाही मी एक नाटक दिग्दर्शित करत आहे आणि मे-जूनच्या दरम्यान ते रंगभूमीवर येईल. प्रशांत दळवीने हे नाटक लिहिले आहे. त्याशिवाय एका नव्या चित्रपटाची जुळवाजुळव चालू असून त्याचे कामदेखील एप्रिलमध्ये सुरू होत आहे.
०   नाटय़ परिषदेकडे तुम्ही कसे काय फिरकलात?
– खरेतर या बाबतीत अनेकदा बोलून झाले आहे. तरीही पुन्हा एकदा.. मी दिग्दर्शक म्हणून माझे काम चोख करत असतो. मात्र तेवढेच पुरेसे नाही. मुळात मी एक चळवळीतील माणूस आहे. माझ्यात एक कार्यकर्ता दडला आहे. आणि नाटक हीदेखील मी एक चळवळ मानतो. या चळवळीची मातृसंस्था म्हणजे नाटय़ परिषद. महाराष्ट्रभरात नाटकविषयक अनेक उपक्रम राबवले गेले पाहिजेत. त्यासाठी नाटय़ परिषद हे उत्तम माध्यम आहे. मी नाटय़ परिषदेचा सदस्य होतोच. पण केवळ संमेलने किंवा इतर कार्यक्रमांपुरता.
यंदा मला विनय आपटे यांनी स्वत:हून निवडणूक लढवण्याबाबत विचारणा केली. विनय आपटे यांचा आणि माझा परिचयही खूप जुना आहे. पत्रकारिता सोडून मी या क्षेत्राकडे पूर्ण वेळ वळण्यासाठी विनय आपटे कारणीभूत आहेत. त्यांनीच मला प्रोत्साहन दिले होते. आता राजन भिसे, विजय केंकरे यांच्यासह मीदेखील निवडून आलो आहे. आता महाराष्ट्रभर नाटकासाठी चांगले काम करण्याचा विचार आहे.
०   पण या निवडणुकीच्या निमित्ताने कलावंत म्हणवणाऱ्या सगळ्यांचीच जी नामुष्की झाली..
– ती नामुष्की धुऊन टाकणे, हे सध्या आमच्यासमोरील सर्वात मोठे काम आहे. त्यासाठी आम्ही सर्व एकत्र येऊन काम करू. पण एक नक्की, नाटय़ परिषदेच्या निवडणुकीत जे काही प्रकार घडले, त्यावरून काही वेगळेच हितसंबंध या सर्वच निवडणुकीत गुंतल्याची शंका येते. आम्हा सर्वानाच हा खूप मोठा धक्का होता. विरोधी पॅनल असो किंवा आमच्या पॅनलमधील लोक असोत, आम्ही एकमेकांच्या बरोबर काम करणारी माणसे आहोत. हा प्रकार घडला, ही खंत नक्कीच मनात आहे. पण प्रेक्षकांचा विश्वासही नव्याने जिंकायचा आहे.