एखाद्या कलाकृतीत देवाशी किंवा धर्माशी संबंधित उल्लेख आल्यानंतर त्या कलाकृतीविरोधात किंवा कलाकारांविरोधात आंदोलने करणे किंवा कलाकारांना धमक्या देणे, हे प्रकार गेल्या काही वर्षांत सर्रास घडत आहेत. ‘येडा’ या चित्रपटाबाबतही असाच प्रकार होण्याची शक्यता आहे. या चित्रपटातील काही प्रसंगांबद्दल आक्षेप नोंदवण्यासाठी काही अज्ञात व्यक्तींनी थेट दिग्दर्शक किशोर बेळेकर यालाच फोन करून दटावले आहे. चित्रपटातून हे प्रसंग न वगळल्यास ‘कृती’ करण्याचा इशाराही या व्यक्तींनी दिला. ‘येडा’ या चित्रपटातील मुख्य पात्र अप्पा कुलकर्णी (आशुतोष राणा) एका प्रसंगात देवाशी भांडण करताना आणि देवाला अद्वातद्वा बोलताना दाखवला आहे. त्याचप्रमाणे अप्पा कुलकर्णी कोणाचाही खून करायला जाताना ‘जयराम श्रीराम’ असा घोष पाश्र्वसंगीतातून होतो. या प्रसंगांबाबत दिग्दर्शक किशोर बेळेकर याला दूरध्वनीवरून काही अज्ञात लोकांनी दमदमाटी केली.  ‘जयराम श्रीराम’ हा घोष अंत्ययात्रेतही केला जातो. आपण तो केवळ सूचक म्हणून वापरला आहे. तसेच प्रत्येक व्यक्ती मनातल्या मनात देवाशी भांडत असतेच. त्यामुळे त्या भांडणातही वावगे काहीच नाही, असे स्पष्टीकरण बेळेकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केले.