News Flash

पारंपरिक उत्साहात आज ‘येळ’ अमावस्या

लातूर, उस्मानाबाद परिसरातील शेतकरी वर्षांतील महत्त्वाचा सण म्हणून येळ अमावस्या साजरी करतात. मुख्यत्वे हा सण कर्नाटक प्रांतात साजरा केला जातो. सीमेलगतच्या भागात लातूर, उस्मानाबाद व

| January 11, 2013 01:53 am

लातूर, उस्मानाबाद परिसरातील शेतकरी वर्षांतील महत्त्वाचा सण म्हणून येळ अमावस्या साजरी करतात. मुख्यत्वे हा सण कर्नाटक प्रांतात साजरा केला जातो. सीमेलगतच्या भागात लातूर, उस्मानाबाद व काही प्रमाणात सोलापूर, नांदेड जिल्ह्यांतील शेतकरी हा सण साजरा करतात. कानडी भाषेत येळ म्हणजे सात. मराठी महिन्यातील सातवी अमावस्या शेतात लक्ष्मी व पांडवाची पूजा करून साजरी केली जाते.
महालक्ष्मीचा सण घरोघरी भक्तिभावाने व श्रद्धेने साजरा केला जातो, त्याच धर्तीवर शेतकरी शेतात हा सण साजरा करतात. गावोगावी कोणीही घरात न थांबता सगळे गाव शेतात जाते. या काळात गावांची अवस्था संचारबंदी लागू केल्यासारखी असते. मोठय़ा उत्साहाने आपापल्या कुवतीप्रमाणे इष्टमित्रांसह हा सण साजरा केला जातो. बाजरी व ज्वारीचे उंडे, सर्व भाज्या एकत्र करून तयार केलेली भाजी (भज्जी), गव्हाची खीर, दही, धपाटे, अंबील या पदार्थाना प्राधान्य दिले जाते. वनभोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर डहाळे, ऊस, बोरे व मधाचा आस्वाद घेतला जातो. सायंकाळी उत्तर पूजेनंतर गोवरीच्या खांडावर मातीच्या लोटक्यात दूध तापवले जाते. दूध उतू जाईल त्या दिशेला पुढच्या वर्षी चांगले पीक येणार असे गृहीत धरले जाते.येळ अमावस्येनंतर थंडी कमी होते. अमावस्येच्या दिवशी पेटवलेल्या पलित्याने (हेंडगा) थंडीला चटका बसतो, असा समज आहे. गेल्या काही वर्षांत वातावरणात बदल झाल्यामुळे येळ अमावस्येनंतरच खऱ्या थंडीला प्रारंभ होत आहे. मात्र, पूर्वापार सुरू असलेली ही परंपरा श्रद्धेने पाळली जाते. काळ्या आईवर श्रद्धापूर्वक प्रेम केले पाहिजे, तिच्या भरणपोषणाची काळजी घेतली पाहिजे व मातेप्रमाणेच तिच्याशी नाते जोडले पाहिजे हा संस्कार देणारा सण म्हणजे येळ अमावस्या. त्यामुळेच या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवंगत नेते विलासराव देशमुख यांनी आपल्या हयातीत एकदाही बाभळगावची येळ अमावस्या चुकवली नाही. एकवेळ दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला उपस्थिती लावली नसेल,मात्र येळ अमावास्या कधी चुकवली नाही. लातूर परिसरात त्यांच्या ग्रामीण संस्कृतीवरील प्रेमाचे कौतुक होत होते. यावर्षी सर्वानाच विलासराव नसल्याची हुरहुर लागून राहणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2013 1:53 am

Web Title: yel new moon utsav today
Next Stories
1 सर्वसामान्यांसाठी दोन तास तरी दालनात थांबा!
2 तीनशे महाविद्यालयांना बरोबर घेऊन उद्यापासून जैविक शेती जनजागृती
3 त्यागाच्या भावनेने समाजासाठी कार्य करणे महत्त्वाचे – पाचपोर
Just Now!
X