सोमवारी दुपारी मानसरोवर रेल्वे स्थानकाच्या परिसरात रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेमधील विशालला वैद्यकीय उपचार वेळीच मिळाले असते तर विशाल वाचला असता, असे प्रत्यक्षदर्शीनी ‘लोकसत्ता’ला सांगितले; परंतु वेळीच उपचाराची मदत पोहोचविणारी जीवनदाहिनी १०८ क्रमांकाच्या असमन्वयिक कारभारामुळे विशालला वेळीच उपचार मिळाले नसल्याची खंत पोलिसांनी व्यक्त केली आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विशालच्या अंगावर चाकूचे वार करून अमित तेथून पळून गेल्यानंतर अनेक प्रवाशांनी विशालला जमिनीवर रक्तामध्ये लोळताना पाहिले. मात्र कामोठे पोलीस ठाण्यामधील पोलीस नाईक राज हांदे हे घटनास्थळी पोहोचल्यानंतर मदतीची सुरुवात झाली. हांदे यांनी तूर्तास रुग्णवाहिकेसाठी १०८ क्रमांकावर संपर्क साधला. मात्र या केंद्रावरून कळंबोली वाहतूक शाखेसमोर उभी असणारी रुग्णवाहिका इतर कॉलवर रुग्णवाहिका उपलब्ध नाही तसेच उरण येथून रुग्णवाहिका पाठवितो, असे उत्तर हांदे यांना मिळाले. अखेर हांदे यांनी जवळच्या बघ्यांपैकी धीरज पांडे या प्रवाशाच्या साहय़ाने स्थानिक रिक्षाचालकांची मदत घेतली. कामोठे येथील रिक्षाचालकांना नेहमी प्रवाशांची लूटमार करणारे रिक्षाचालक असे हिणवले जाते, मात्र जखमी विशालला वेळीच उपचार मिळावे यासाठी मानसरोवर रेल्वे ेस्थानकासमोरील स्थानिक रिक्षाचालक स्वत:हून पुढे आले. अखेर विशालला रिक्षात भरून ती रिक्षा कामोठे येथील एमजीएम रुग्णालयाकडे दामटवण्यात आली. मात्र या सर्व धावपळीचा फायदा विशालला मिळू शकला नाही. रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी विशालला तपासल्यावर त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
कामोठे एमजीएम रुग्णालयापासून हाकेच्या अंतरावर १०८ क्रमांकावर कॉल आल्यानंतर धावणारी रुग्णवाहिका उभी दिसल्याने मदतकर्त्यांनी १०८ च्या केंद्रावर व रुग्णवाहिकाच्या पायलटकडे चौकशी केल्यावर अजब प्रकार उघडकीस आला. ज्या वेळी पोलीस नाईक हांदे यांनी रुग्णवाहिका मदतीसाठी संपर्क साधला होता त्या वेळी ही रुग्णवाहिका कळंबोली वाहतूक शाखेसमोर उभी होती. तसेच या रुग्णवाहिकेवरील डॉक्टरही उपलब्ध नाही. यामुळे हांदे यांनी पुन्हा १०८ क्रमांकावर फोन करून याबाबतची सत्य माहितीची पडताळणी केल्यावर १०८ च्या असमन्वयिक कारभाराची तक्रार नोंदविली. डॉक्टर व रुग्णवाहिकेने वेळीच धाव घेतली असती तर विशाल आज जिवंत असता, असे विशालच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. या संपूर्ण असमन्वयिक कारभाराची १०८ क्रमांकावर तक्रार क्रमांक ८९२ द्वारे नोंद करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 108 ambulance in mumbai
First published on: 21-01-2015 at 06:58 IST