सध्या सर्वत्र गर्दी खेचत असलेला ‘दुनियादारी’ हा चित्रपट सुहास शिरवळकर यांच्या याच नावाच्या कादंबरीवरून तयार करण्यात आला. एकेकाळी ही कादंबरी खूप गाजली होतीच. पण आता या चित्रपटाच्या निमित्ताने ‘दुनियादारी’ कादंबरीची मागणी मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. लवकरच या कादंबरीची ११ वी आवृत्ती प्रकाशित होणार आहे. या चित्रपटाने तरुण आणि विद्यार्थी पुन्हा एकदा मराठी वाचनाकडे वळले आहेत.
पुस्तक विक्रेते, ग्रंथालये आणि पुस्तक प्रदर्शनांमधून ‘दुनियादारी’ला सर्वस्तरातील आणि वयोगटातील वाचकांकडून  मागणी असल्याने सध्या ही कादंबरी लई भारी ठरली आहे. या कादंबरीच्या पाचव्या आवृत्तीपासून ते आजपर्यंतच्या आवृत्तीपर्यंत कादंबरीचे मुखपृष्ठ प्रसिद्ध चित्रकार रविमुकुल यांच्या कुंचल्यातून साकारले आहे. ही कादंबरी शशीदीप प्रकाशन या संस्थेने प्रकाशित केली आहे.
या प्रकाशन संस्थेचे शशिकांत खोपकर यांनी ‘वृत्तान्त’ला सांगितले की, १९८२ मध्ये ही कादंबरी प्रकाशित झाली. तेव्हापासून आजपर्यंत कादंबरीच्या दहा आवृत्या प्रकाशित झाल्या असून ११ वी आवृत्ती लवकरच प्रकाशित होत आहे. ‘दुनियादारी’ चित्रपटामुळे पुन्हा या कादंबरीची मागणी वाढली असली तरी पहिल्यापासूनच कादंबरीला वाचक मिळाल्याने ती लोकप्रिय ठरली आहे.
तरुण पिढी मराठी वाचत नाही, दूरचित्रवाणी, इंटरनेट यांच्या आहारी गेली असल्याचे बोलले जाते. ‘दुनियादारी’च्या निमित्ताने तरुण वर्ग विशेषत: शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी पुन्हा या कादंबरीकडे पर्यायाने वाचनाकडे वळले, असल्याचेही खोपकर म्हणाले.
कादंबरीचे मुखपृष्ठकार रविमुकुल यांनी सांगितले की, पाचव्या आवृत्तीपासून कादंबरीचे मुखपृष्ठ मी केले. सुहास शिरवळकर आणि मी चांगले मित्र होतो. शिरवळकर यांची लेखनशैली ही वाचकांना खिळवून ठेवणारी होती. तरुण पिढीची भाषा त्यांच्या लेखनात असल्याने त्यांना ते लेखन आपले वाटायचे आणि आजही वाटते. कादंबरीतील पात्रांच्या वर्णनानुसार मी माझ्या डोक्यात त्यांचा एक ‘कोलाज’ तयार केला आणि पोर्ट्रेट स्वरूपात न करता स्केचेच या प्रकारात आपण ही पात्रे रंगविली.
संपूर्ण महाराष्ट्रभर पुस्तक प्रदर्शने आयोजित करणाऱ्या ‘अक्षरधारा’ या संस्थेचे लक्ष्मण राठिवडेकर यांनी सांगितले की, चित्रपटामुळे ‘दुनियादारी’ची कादंबरी मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. या कादंबरीबरोबर शिरवळकर यांच्या अन्य पुस्तकानाही मागणी आहे. कादंबरीला सर्व वयोगटातील वाचकांकडून मागणी असली तरी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. या कादंबरीच्या निमित्ताने मराठी वाचन न करणारे तरुण, विद्यार्थी मराठी वाचनाकडे वळले आहेत.