सराफाकडून सोन्याच्या लगडी घेऊन त्याचे दागिने तयार करणाऱ्या एका कारागिराला बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास स्वारगेट परिसरात चाकूचा धाक दाखवून लुटण्यात आले. यावेळी या कारागिराजवळील तेरा लाख पंच्चावन्न हजार रुपयांचा ऐवज आरोपींनी लंपास केला.
या प्रकरणी महंमद मुफीजुल ईस्लम अकबरअली महंमद (रा. रविवार पेठ, लोणार आळी) या कारागिराने तक्रार दाखल केली आहे. स्वारगेट परिसरातील कॅनॉलजवळील कचराकुंडीजवळ ही घटना घडली. महंमद हे स्वप्नील एंटरप्रायझेस यांचे ३४० ग्रॅम सोन्याचे दागिने दुचाकीवरून घेऊन जात असताना अण्णा भाऊ साठे चौक, नवलोबा मंदिरासमोरील रस्त्यावर आरोपींनी त्याच्या गाडीस धडक दिली. त्यावेळी महंमद यांनी आरोपींकडे पाहिले असता त्यांनी, ‘क्यारे हमारे पास देखता है’ असे म्हणून त्यांनी कारागिराला शिवीगाळ केली. ते ऐकून ‘कुछ नही’ असे म्हणून फिर्यादी पुढे गेले. ते सावरकर पुतळा चौक ओलांडून, कॅनॉल पास करून कचराकुंडी जवळ पोहोचले असता आरोपींनी त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळील सोन्याची चेन, एक केडीअम सोन्याचा मणी, गोल सोन्याच्या चेनचा चुरा असा तेरा लाख पंच्चावन्न हजार रुपयांचा ऐवज लुटला. या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एम. पी. ढेरे पुढील तपास करत आहेत. स्वारगेट पोलिसांनी आरोपींच्या वर्णनावरून रेखाचित्रे तयार केली आहेत.