रोटरी क्लब ऑफ नागपूरने आपल्या सामाजिक दायित्वांतर्गत रामटेक तालुक्यातील १४२ नागरिकांवर नि:शुल्क शस्त्रक्रिया करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले. शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्णांना नि:शुल्क औषधे आणि अन्य सुविधा पुरवण्यात आल्या.
ऑरेंज सिटी रुग्णालय आणि संशोधन केंद्रातर्फे रामटेक येथे योगिराज स्वामी सीतारामदास महाराज रुग्णालय चालवले जाते.
या रुग्णालयामध्ये रोटरी क्लब ऑफ नागपूरतर्फे रामटेक परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात एकूण ५०० नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १४२ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात ९० नागरिकांची मोतीबिंदूसाठी तर ५२ नागरिकांची हर्निया, अंडकोष वृद्धी, लिपोमा, थायराईड शस्त्रक्रिया करण्यासाठी निवड करण्यात आली. या १४२ नागरिकांवर गेल्या एक महिन्यात योगिराज सीतारामदास महाराज रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शस्त्रक्रिया केल्यानंतर या रुग्णांना रुग्णालयात राहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली. तसेच आवश्यक औषधीही उपलब्ध करून देण्यात आल्या.
या शस्त्रक्रिया डॉ. राजेश सिंघानिया यांच्या नेतृत्वाखाली डॉ. सुरजीत हरजा, डॉ. राजू विल्किन्सन, डॉ. राजेश सिंघवी, डॉ. रफत खान, डॉ. प्रशांत चौधरी, डॉ. शिवानी बिडिये, डॉ. राजीव सोनारकर, डॉ. यशपाल लांबा, डॉ. अभय आगाशे, डॉ. रुपाली निंबाळकर, डॉ. ऋतजा देव, डॉ. शोभा डागा, डॉ. इंद्रजीत अग्रवाल, डॉ. दक्षा मंधानिया यांनी केल्या. त्यांना योगिराज रुग्णालयाचे प्रमुख डॉ. दीपक डोंगरे, डॉ. रोशन जावडेकर, डॉ. भूमेश नाटकर, डॉ. नितेश लाकडे, डॉ. रुपेश राजपूत, डॉ. उमेश वर्मा, संध्या धनवते, पिंकी साखरे, गीतांजली सावडेकर, ममता मेश्राम, रक्षा गौरखेडे, वैशाली साकोरे, सीमा बन्सोड, शेखर देशमुख, विराज कांबळे, दीपक बंधते, प्रशांत लिल्लारे यांनी सहकार्य केले.
ऑरेंज सिटी रुग्णालयातील शस्त्रक्रिया तज्ज्ञ, बधिरीकरणतज्ज्ञ व योगिराज रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे या शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्याचे रोटरी क्लब नागपूरचे अध्यक्ष भारतराज गोयंका यांनी म्हटले आहे. ऑरेंज सिटी रुग्णालयाचे अध्यक्ष उदयभास्कर नायर, संचालिका डॉ. उषा नायर, संचालक डॉ. अनुप मरार यांनी रोटरी क्लबचे पदाधिकारी व डॉक्टर्स, योगिराज हॉस्पिटलमधील कर्मचारी आणि ऑरेंज सिटी रुग्णालयातील शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांचे अभिनंदन केले आहे.