रस्त्यावरील १५ टक्के मुले नशाबाज

मुंबईत रस्त्यावरच आपले आयुष्य (बालपण) घालविणारी मुले विविध व्यसनांना बळी पडत असतात. त्यातही सहज उपलब्ध होणाऱ्या बुटपॉलिश, कार्यालयात हमखास वापरले जाणारे व्हाइटनर आदी हुंगून नशा

मुंबईत रस्त्यावरच आपले आयुष्य (बालपण) घालविणारी मुले विविध व्यसनांना बळी पडत असतात. त्यातही सहज उपलब्ध होणाऱ्या बुटपॉलिश, कार्यालयात हमखास वापरले जाणारे व्हाइटनर आदी हुंगून नशा करणाऱ्यांची संख्या मोठी असते. ‘टाटा सामाजिक विज्ञान संस्था’ आणि ‘अ‍ॅक्शन एड इंडिया’ तसेच अन्य संस्थांच्या मदतीने मुंबईत करण्यात आलेल्या या मुलांच्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. या सर्वेक्षणानुसार मुंबईत ३७,०५९ मुले रस्त्यावर राहत असून त्यात ७० टक्के मुलगे आहेत. यापैकी रेल्वे प्लॅटफॉर्मवर ९०५ मुले राहात असल्याचे हा अहवाल सांगतो.
चार भिंतीच्या सुरक्षित आसऱ्यात राहणाऱ्यांना झिणझिण्या येतील अशा अनेक बाबी रस्त्यावरील या मुलांच्या सर्वेक्षणातून समोर आल्या आहेत. रस्त्यावर राहणाऱ्या मुलांपैकी १५ टक्के मुले अंमली पदार्थाची नशा करतात. तंबाकू, व्हाइटनर, बुटपॉलिश अशा तुलनेत स्वस्तातील आणि सहजी उपलब्ध होणाऱ्या नशा आणणाऱ्या वस्तूंचा वापर ही मुले करीत असल्याचे आढळून आले आहे.
रस्त्यावरच्या मुलांना अर्थातच निवाऱ्याची समस्या मुख्यत्वे भेडसावत असते. यातील ३७ टक्के मुले कोणत्या ना कोणत्या छपराखाली अर्थात झोपडय़ांत राहतात. तर २० टक्के मुलांना तेवढाही निवारा मिळत नाही. ती थेट रस्त्यावरच राहतात आणि झोपतातही. १८ टक्के मुले ही गलिच्छ वस्ती, झोपटपट्टय़ांत राहतात, असे या अहवालातील आकडेवारी सांगते.
आरोग्याची समस्या हा या सर्व मुलांचा समान दुवा आहे. किमान १८ टक्के मुले विविध आजार आणि रोगांनी ग्रासलेली आहेत. ९ टक्के मुलांना ताप तर ३ टक्के मुलांना त्वचेचे विविध विकार झाले आहेत. दुर्दैव म्हणजे अतिशय गरज असूनही या मुलांना कोणत्याही प्रकारची वैद्यकीय मदत मिळू शकत नाही. या मुलांपैकी ११.५० टक्के मुले आपले आणि आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी वेगवेगळे व्यवसाय करतात. फुले, फळे विकणे, वृत्तपत्रे टाकणे आदी कामे ही मुले करतात. सुमारे ८ टक्के मुले भीक मागतात, तर २.५ टक्के मुले मिळेल ते काम करतात.

अहवालातून समोर आलेल्या काही ठळक बाबी
* रस्त्यावरील या एकूण ३७,०५९ मुलांमध्ये ९०५ मुले रेल्वेस्थानकांवरील आहेत
* ६५ टक्के मुले ही त्यांच्या कुटुंबाबरोबर रस्त्यावरील तात्पुरत्या निवाऱ्यात राहणारी आहेत
* शाळेत जाण्याच्या वयाची २४ टक्के मुले अशिक्षित
* ४ ते ६ या वयोगटातील फक्त ३१ टक्के मुले बालवाडीत जातात
* ४०.२ टक्के मुले सार्वजनिक  प्रसाधनगृहाचा वापर करतात

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 15 percent road childrens drug takers