मुंबईतील सांस्कृतिक घडामोडींमध्ये अग्रणी असलेल्या एनसीपीएमध्ये ६ डिसेंबरपासून नाटय़रसिकांसाठी पर्वणी असलेला ‘सेंटर स्टेज महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. यंदा या महोत्सवाचे चौथे वर्ष असून दरवर्षी या महोत्सवात विविध दर्जेदार नाटकांचे पहिले प्रयोग केले जातात. ६ ते १६ डिसेंबर असा ११ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात यंदा पाच भाषांतील १६ नवीन नाटकांचा सहभाग आहे. यंदाच्या महोत्सवात ‘आविष्कार’ संस्थेचे ‘शंभर मी’ आणि ‘थेटरॉन प्रोडक्शन’चे ‘केट्टाकथा’ या दोन मराठी नाटकांचा समावेश आहे.
ओम पुरी आणि नासिरुद्दिन शाह हे दोन दिग्गज अभिनेते या महोत्सवाचे आकर्षण असतील. तब्बल २५ वर्षांनंतर रंगभूमीवर येणाऱ्या ओम पुरी यांच्या ‘तुम्हारी अम्रिता’ या पंजाबी नाटकाने या महोत्सवाची सुरुवात होणार असून महोत्सवाची सांगता नासिरुद्दिन शाह यांच्या ‘फर्स्ट लव्ह’ या इंग्रजी नाटकाने होणार आहे.
या महोत्सवात सादर होणाऱ्या काही नाटकांत अमेरिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांतील कलाकारांचाही सहभाग आहे. ‘लॉट्स ऑफ लव्ह’ या ‘प्रोटाइन’ संस्थेतर्फे सादर होणाऱ्या नाटकाला ब्रिटिश काऊन्सिलचे साहाय्य लाभले आहे. त्याप्रमाणे कलाकारांसाठी अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ‘ट्रिनिटी स्कूल ऑफ लंडन’तर्फे एक खेळ होणार आहे. त्याचबरोबर गुलजार यांनी अनुवादित केलेले ‘युधिष्ठीर और द्रौपदी’ हे नाटकही या महोत्सवात सादर होईल. पवन वर्मा यांनी लिहिलेल्या एका दीर्घ कवितेवर आधारित या नाटकात महाभारतातील काही प्रसंगांचे चित्रण केले आहे.  महोत्सवात या नाटकांव्यतिरिक्त काही लघुपट आणि माहितीपट यांचाही खेळ होणार आहे. यात ‘बहुआयामी गो. पु.’, ‘तेंडुलकर अ‍ॅण्ड व्हायोलन्स – देन अ‍ॅण्ड नाउ’ आणि ‘सतीश आळेकर, द प्लेराइट’ यांचा समावेश आहे. हा महोत्सव एनसीपीएच्या आवारात असलेल्या विविध सभागृहांमध्ये होणार असून त्यासाठी विशिष्ट शुल्कही आकारण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ६६२२३७३७ या क्रमांकावर संपर्क साधावा.