अश्व खरेदी-विक्रीसाठी देशभरात प्रसिध्द असलेल्या खान्देशातील सारंगखेडा यात्रेला अद्याप दोन दिवसांचा अवधी असतानाच १५०० अश्व येथे दाखल झाले असून त्यापैकी १७ अश्वांची विक्रीही झाली आहे. या विक्रीतून आठ लाख २० हजार रूपयांची उलाढाल झाली आहे.
दत्तजयंतीनिमित्त २७ डिसेंबरपासून सारंगखेडा यात्रोत्सव सुरू होत आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेश या तीन राज्यातील सीमावर्ती भागातील भाविक आवर्जून या यात्रेस हजेरी लावतात. अश्व बाजारासाठीही ही यात्रा प्रसिध्द असून उत्तर प्रदेशातील राया येथील याकूब चौधरी यांचा पंजाब जातीचा अश्व एक लाख ११ हजार रुपयांना लातूर येथील अब्दूल सत्तार मेहताब खोरीवान यांनी खरेदी केल्याची माहिती शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय चौधरी यांनी दिली. यात्रेत गरम मसाले, सुका मेवा यांचीही उलाढाल मोठय़ा प्रमाणावर होत असते. शेती औजारांसाठीही यात्रा प्रसिद्ध आहे. त्यात बैलगाडी, नांगर, कोळपणी, या औजारांपासून मशागतीसाठी लागणारे किरकोळ साहित्यही उपलब्ध असते.
सुमारे १५ दिवस पूर्ण भरात चालणाऱ्या यात्रोत्सवानिमित्त होणाऱ्या ‘चेतक फेस्टिव्हल’ मध्ये या वर्षी अश्व शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्या अश्व मालकांना ‘चेतक’ आणि ‘कृष्णा’ पारितोषिकाचे वितरण सिने कलावंत शक्ती कपूर यांच्या हस्ते केले जाणार आहे. यात्रेची प्रसिध्दी देशभरात सर्वत्र पोहोचलेली असल्याने अनेक सिने कलाकार खास अश्व खरेदीसाठी या यात्रेस भेट देत असतात.
तसेच यात्रेत होणाऱ्या गर्दीचा लाभ उठविण्यासाठी सिने तारकांच्या कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते. २९ डिसेंबर रोजी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा ‘लख लख चंदेरी’ हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे संयोजक जयपाल रावल यांनी दिली.