घराच्या अंगणात खेळत असलेल्या दोन वर्षांच्या बालकावर अंधाराचा फायदा घेत बिबटय़ाने हल्ला केल्याची घटना काल रात्री शहरानजीकच्या जाखुरी गावात घडली. बालकाच्या मानेला जबडय़ात पकडून बिबटय़ा शेजारच्या शेतात घेऊन गेला. या हल्ल्यात बालकाचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, वीज कंपनी तसेच वन विभागाच्या गलथान कारभाराचा हे बालक बळी ठरल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले.
जयेश नाना राहाणे असे दुर्दैवी बालकाचे नाव असून त्या दाम्पत्याचे ते एकच अपत्य होते. काल रात्री नऊच्या सुमारास जयेश अंगणात खेळत होता. त्याची आई जवळच भांडी घासत होती. भारनियमनामुळे सर्वत्र अंधार दाटला होता. त्याचाच फायदा घेत चोरपावलाने आलेल्या बिबटय़ाने बालकावर झडप घालून त्याला लगतच्या शेतात नेले. हा प्रकार पाहून भेदरलेल्या आईने आरडाओरडा केला त्यामुळे आजूबाजूचे लोक शेताकडे धावले. मोटारी व मोटारसायकलींचा प्रकाशझोत टाकून शोध घेण्याचा प्रयत्न केला. चोहूबाजूंनी आलेला प्रकाश आणि लोकांच्या गोंधळामुळे भेदरलेला बिबटय़ा शेतात दिसला. त्याने बालकाला तेथेच टाकून धूम ठोकली. हल्ल्यामध्ये मोठा रक्तस्राव झालेल्या बालकाचा मृत्यूशी संघर्ष सुरू होता. तशाच अवस्थेत त्याला संगमनेरमध्ये आणण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. घटनेची माहिती वीज वितरण कंपनीला देण्यात आलेली होती. त्यामुळे वीजपुरवठाही सुरू झाला, मात्र तोपर्यंत सगळे संपले होते.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Sep 2013 रोजी प्रकाशित
बिबटय़ाच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू
घराच्या अंगणात खेळत असलेल्या दोन वर्षांच्या बालकावर अंधाराचा फायदा घेत बिबटय़ाने हल्ला केल्याची घटना काल रात्री शहरानजीकच्या जाखुरी गावात घडली.
First published on: 03-09-2013 at 01:56 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2 years old child killed in attaking leopard