आषाढी यात्रेच्या सोहळय़ासाठी आपल्यासमवेत आणलेला दोन वर्षे वयाचा बिराप्पा नावाचा मुलगा एकादशीच्या दिवशी दि. १९ जुलै रोजी सकाळी चंद्रभागा वाळवंटातून बेपत्ता झाला आहे, अशी तक्रार विठ्ठल येडफळ (रा. मारिहल्ली हुकेरी, जि. बेळगाव) यांनी शहर पोलिसात दाखल केली आहे.
आषाढी एकादशीच्या स्नानाकरिता विठ्ठल हे बिराप्पा यास घेऊन गेले असता सकाळी सव्वाआठच्या सुमारास तो चंद्रभागा वाळवंटातून बेपत्ता झाला आहे. त्याचा सर्वत्र चार दिवस शोध घेतला. परंतु, हा दोन वर्षे वयाचा बिराप्पा सापडला नाही. बिराप्पाच्या अंगात निळय़ा रंगाचा शर्ट, तांबडी हाप पँट, कानात सोन्याच्या रिंगा, रंग सावळा, पिवळय़ा रंगाची टोपी आहे. त्याला अजून नीट बोलताही येत नाही. यासंदर्भात शहर पोलिसात तक्रार दाखल केली असून, पोलिसांसह बिराप्पाचे नातेवाईक शोध घेत आहेत. वारीत अनेक जण हरवतात, सापडतात, परंतु या दोन वर्षे वयाच्या बिराप्पाचा शोध अद्याप लागला नाही. त्याचे अपहरण किंवा कोणी पळवून नेले हे नेमके समजून येत नाही. वरील वर्णनाचा मुलगा आढळून आल्यास शहर पोलीस स्टेशनला पो. ना. पवार यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक रेड्डी यांनी केले आहे.