पारंपरिक लोकप्रिय हिंदी चित्रपट म्हणजे जेवणाची थाळी असे कौतुकाने म्हटले जाते, तसे ते आता ‘हिंदी चित्रपटसृष्टी म्हणजेही जेवणाची थाळी’ असे म्हणावे लागेल, अशी २०१३ ती ‘चित्र स्थिती’ आहे..  यंदाही शाकाहारी-मांसाहारी फराळाची हमी भरपूर.
थाळीत कसे दोन वाटय़ा भाज्या (कथाप्रधान चित्रपट), एक आमटी (रहस्यमय चित्रपट), एक वाटी दही (वाट चुकलेला चित्रपट), थोडी कोशिंबीर (वेगळ्या वाटेचा चित्रपट), दोन रोटी अथवा पुरी (काय वाट्टेल तसे मनोरंजन करणारा चित्रपट), एक वाटी भात (रिमेक अथवा सिक्वेल), ताक (‘ताक धीन’ संगीत-नृत्यमय चित्रपट) व स्वीट डिश (स्वच्छ मनोरंजनवाला) असे सगळे मिळते, अगदी तेच ‘आपला चित्रपट’ देतो.. मांसाहारी थाळीत वेगळी चव. पापलेट, सुरमई (धाडसी चित्रपट) एक वाटी वगैरे. ‘टेबल नं. २१’ व ‘देखा जो पहिली बार’ या चित्रपटांपासून हिंदीचा प्रवास सुरू झाला. या प्रवासात तब्बल दीडशे चित्रपट भेटायला येणार आहेत. कदाचित आकडा वाढेलही. पण गुणवत्तेचे काय? त्याची चर्चा सगळ्यांच्याच हिताची, त्याचा चित्रपटसृष्टी, प्रसार माध्यम, चित्रपटाचे अभ्यासक व सर्व स्तरातील प्रेक्षक या सगळ्यांच्या बौद्धिक वाढीसाठी फायदा होतो. उत्पन्नाच्या ‘प्रसिद्धी खात्या’कडून वाढवून दिलेल्या आकडय़ांनी सगळेच का फसतात? पैसा महत्त्वाचा वाटतो म्हणून?
अब्बास-मस्तानचा रहस्यमय ‘रेस २’. पण मध्यंतराला नव्हे तर शेवटी रहस्याचा चकमा देतो तोच चांगला रहस्यरंजक चित्रपट हे या ‘जोडी’ला समजत कसे नाही? यशस्वी दिग्दर्शकाच्या चित्रपटात भूमिका साकारल्याने आपण कायम ‘उंची’वर राहतो या नियमानुसार शाहरूख खान रोहित शेट्टीच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’मध्ये येईल. दीपिका पदुकोण पंचेचाळिशी पार नायकांचीच नायिका होण्यात जास्त रस का हो घेते? साजिद नडियादवालाने दिग्दर्शन पदार्पण केलेल्या ‘क्लिक’मध्ये ती सलमानसोबत दिसेल.