राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशन (अभियान) अंतर्गत अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक व पुणे या सहा विभागत सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणासाठी मराठी व इंग्रजी माध्यमाचा वापर करत चार प्रकारच्या प्रश्नावली भरून घेण्यात आला. सर्वेक्षणांती वयाच्या मानाने कमी उंची असणाऱ्यांचे प्रमाण २२.८, उंचीच्या मानाने कमी वजन असणाऱ्यांचे प्रमाण १५.५ आणि वयाच्या मानाने कमी वजन असणाऱ्यांचे प्रमाण २१. ८ टक्के असल्याचे पुढे आले आहे.
माहिती संकलित करण्याचे हे काम गेल्या मार्च व एप्रिल महिन्यात करण्यात आले. त्याकरिता मराठी व इंग्रजी भाषेतील चार प्रश्नावली तयार करण्यात आल्या. विविध वयोगटानुसार, भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करता यावा यादृष्टीने गाव प्रश्नावली, घर प्रश्नावली, स्त्री प्रश्नावली व बालक प्रश्नावली तयार करण्यात आली. गाव प्रश्नावलीत एकात्मिक बाल विकास योजना, आरोग्य व इतर सेवांच्या उपलब्धतेच्या माहितीवर भर देण्यात आला. कोणकोणत्या वस्तू व मालमत्ता तेथे आहेत, स्वच्छतेबद्दल पध्दती कशा आहेत, आयोडिनयुक्त मीठाची उपलब्धता आणि इतर निवडक अन्न सुरक्षा निर्देशकांबद्दल माहितीवर भर देण्यात आली. ज्या घरांत सुधारित स्त्रोतांतून पाणी वापरतात, अशा घरांची संख्या ९२.२ टक्के आहे. घरामध्ये पिवळ्या रंगाचे किंवा अंत्योदय रेशन कार्ड उपलब्ध आहे अशी २३.२ घरे आढळून आली. स्त्रीच्या प्रश्नावलीत महिलांच्या स्थितीविषयी, कामाचे स्वरूप, विवाह व प्रजनन, प्रसुतीनंतर काळजी, प्रसुतीच्या वेळी घ्यावयाची काळजी, जीवनशैलीबद्दलचे निर्देशक व मानव विकास शास्त्रातील
मापकांचा समावेश केलेला होता. त्यात ज्या मातांचा विवाह १८ वर्षे वय होण्यापूर्वी झाले, अशा व २०-२४ वर्षे वयोगटातील मातांचे प्रमाण ३० टक्के, ज्या मातांनी आधीच्या गरोदरपणात ९० दिवस किंवा जास्त काळासाठी लोह व ‘फॉलिक अ‍ॅसिड’ घेतले, अशा मातांची संख्या ५७.९ टक्के आहे. ज्या मातांचा ‘बॉडी
मास इंडेक्स’ १८.५ पेक्षा कमी राहिला अशा मातांचे प्रमाण ३१.९ टक्के आहे.
बालक प्रश्नावलीत बालकांची वैशिष्टये, आहाराच्या व संगोपनाच्या पध्दती, लसीकरण व वजन, उंची मापनासह पोषणाच्या स्थितीबद्दलची माहिती, बालकांना आहार देण्याच्या पध्दतीवर भर देण्यात आला. त्यात किमान एकदा स्तनपान दिले गेले, अशी ० – २३ महिने वयोगटातील ९९.४, ज्यांनी जन्मानंतर एका तासाच्या आत स्तनपान सुरू केले, त्यात ६१.८, घन अर्धघन किंवा मऊ अन्नपदार्थ दिली जाणारी ६-८ महिने वयोगटातील ५९.९ , किमान विविध आहार दिली जाणारी ६-२३ महिने वयोगटातील मुलांचे प्रमाण अत्यल्प म्हणजे ८.९ टक्के आढळून आले.
लसीकरणाबाबतही पालकांमध्ये उदासिनता असल्याचे पुढे आले. त्यात ‘अ’ जीवनसत्व किंवा तत्सम लसीकरणाचे काम केवळ ४८.४ टक्के पालकांनी पूर्ण केले आहे.