मराठवाडय़ातील सध्याची भयावह दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन भविष्यात जलसंधारणाचा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी, तसेच लोकजागृतीसाठी भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाने मराठवाडय़ातील २४ गावे दत्तक घेतली आहेत. विवेक ग्रामयोजनेच्या माध्यमातून दत्तक घेतलेल्या गावांमध्ये विविध स्तरावर जलसंधारण व इतर कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे कार्यवाह प्रा. सतीश पत्की यांनी दिली.
स्वामी विवेकानंद जयंती ६२ देशांमध्ये साजरी केली जाते. या जयंतीनिमित्त संस्था पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून मराठवाडय़ातील २४ गावे दत्तक घेऊन विवेक ग्रामयोजनेतून आरोग्य, जलसंधारण, शिक्षण, जलपुनर्भरण, संस्कार असे कार्यक्रम राबविले जाणार आहेत. ग्रामीण भागातील जनतेला जलसंधारणाचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. भविष्यात दुष्काळाचा सामना करण्यासाठी जमिनीत पाण्याची साठवण, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रयत्न केला जाणार आहे. सुवर्णजयंती महोत्सव समिती या वेळी स्थापन झाली. संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन यांनी या निमित्त दौरा करून या विषयाची मांडणी केली. आगामी वर्षांत संस्था, गावकरी व प्रशासन यांच्या माध्यमातून सर्वागीण विकासाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे, असे पत्की यांनी सांगितले.