खरेदी केलेली जमीन विक्री करू देण्यासाठी धमकावून पंचवीस लाखांची खंडणी घेणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना अधिक तपासासाठी २७ नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
अनिल ज्ञानदेव मानकर (वय ४३, रा. बिजलीनगर, चिंचवड) आणि कपिल रमेश कोठारी (वय ३२, रा. चंद्रलोक सोसायटी, चिंचवड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी संतोष पुरुषोत्तम ओक (वय ६३, रा. गुडविल सोसायटी) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओक यांचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी एका व्यक्तीकडून रावेत सव्‍‌र्हे क्रमांक १७ येथे ७९ गुंठे जमीन खरेदी केली होती. ही जमीन सुरुवातीस पानसे नावाच्या व्यक्तीने विकत घेतो म्हणून ओक यांना पाच लाख रुपये दिले होते. मात्र, पुढची रक्कम न देता पानसे यांनी पुढील कोणताच व्यवहार केला नाही. त्यामुळे ओक यांनी पानसे यांना जमिनीचा व्यवहार पूर्ण करून पैसे द्या, नाही तर तुम्ही दिलेले पैसे घेऊन जा. मी ही जमीन दुसऱ्याला विकतो असे सांगितले. पानसे यांनी यासाठी पाच लाखांऐवजी साडेबारा लाख रुपये ओक यांच्याकडून घेतले. त्यानंतर ओक यांनी जमीन विक्रीसाठी तराळे यांच्याशी बोलणी सुरू होती. त्यावेळी आरोपी मानकर व कोठारी यांनी त्यांना दमदाटी केली. ही जमीन विकायची असेल तर आम्हाला दोघांना प्रत्येकी साडेबारा लाख रुपये द्यावे लागतील, असे धमकाविले. त्यांच्याकडून धनादेशाव्दारे पंचवीस लाख रुपये घेतले. त्यानंतर आणखीन दहा लाख रुपयांची खंडणी मागितली, त्यामुळे ओक यांनी शेवटी गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी या दोघांना अटक केली. यातील मानकर याच्यावर दहा वर्षांपूर्वी काही गुन्हे दाखल होते. त्याच बरोबर त्याने अपक्ष म्हणून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक लढवली आहे.
दोघांना न्यायालयात हजर केले असता अधिक तपासासाठी न्यायालयाने २६ नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, असे सावंत यांनी सांगितले.