सोलापुरातील लोकमंगल प्रतिष्ठानने आयोजिलेल्या सर्वधर्मीय विवाह सोहळ्यात गोरज मुहूर्तावर २६४ जोडप्यांवर अक्षता पडल्या. या निमित्ताने लक्ष भोजन झाले. लोकमंगल प्रतिष्ठानने आयोजिलेला हा सातवा सामूहिक विवाह सोहळा होता. लोकमंगलचे संस्थापक तथा भाजपचे माजी खासदार सुभाष देशमुख हे सामूहिक विवाह सोहळा आयोजनाच्या माध्यमातून आतापर्यंत तब्बल दीड हजार जावयांचे सासरे झाले.
हरिभाई देवकरण प्रशालेच्या विस्तीर्ण प्रांगणात सायंकाळी नेटक्या स्वरूपात हा सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला. या वेळी मुस्लीम व ख्रिश्चन वधू-वरांचाही त्यांच्या धर्म पद्धतीने विवाह लावण्यात आला. सर्व वधू-वरांना रेशीमगाठी बांधताना शुभाशीर्वाद देण्यासाठी गौडगावचे शिवाचार्य डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी, मंद्रूपचे शिवाचार्य रेणुक महास्वामीजी, नागणसूरचे रेवणसिद्ध शिवाचार्य, ह. भ. प. गुरुदास तोडमे गुरुजी, अमोगसिद्ध धुळी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवाय महापौर अलका राठोड, माजी आमदार निर्मला ठोकळ, माजी खासदार लिंगराज वल्याळ, अक्कलकोटचे आमदार सिद्रामप्पा पाटील, आमदार विजय देशमुख, आमदार चंद्रकांत पाटील, डॉ. सुधा कांकरिया, अॅड. शरद बनसोडे आदींनीही हजेरी लावली होती.
विवाह सोहळ्यापूर्वी सकाळपासून हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात ‘लगीनघाई’ दिसत होती. सकाळनंतर भोजनावळी सुरू झाल्या. सायंकाळपर्यंत सुमारे दीड लाख वऱ्हाडी मंडळींनी भोजनाचा आस्वाद घेतला होता. आहेर, रुखवत व इतर विधिकार्याची स्वतंत्र व नियोजनबद्ध व्यवस्था पाहावयास मिळाली. सामूहिक विवाह सोहळ्याचे यंदाचे सातवे वर्ष होते. आतापर्यंत दीड हजार वधू-वरांचे विवाह झाले असून लोकमंगलच्या या सर्व दीड हजार जावईबापूंना मानाचे आहेर करण्यात आले. दुपारी डॉ. सुधा कांकरिया यांनी सर्व वधू-वरांना स्त्री जन्माचे महत्त्व समजावून सांगतिले. स्त्री जन्माचे स्वागत करा, स्त्रीभ्रूणहत्या करू नका, अशी शपथ सर्वाना देण्यात आली. नंतर सर्व वध-वरांची रिक्षातून सामूहिक वरात काढण्यात आली. लोकमंगलचे संस्थापक सुभाष देशमुख यांनी सर्व वधूंचे कन्यादान केले. नंतर सायंकाळी गोरज मुहूर्तावर अक्षता पडल्यानंतर ह. दे. च्या प्रांगणात फटाक्यांची नेत्रदीपक आतषबाजी करण्यात आली. सुभाष देशमुख यांच्यासह रोहन देशमुख, मनीष देशमुख, लोकमंगल परिवारातील विजय जाधव, शहाजी पवार, अविनाश महागावकर, इंद्रजित पवार आदींनी या सामूहिक विवाह सोहळ्याचे नेटके नियोजन केले होते.