उत्तर महाराष्ट्रातील ५०२० पैकी २९७९ गावांमध्ये ५० पैशांपेक्षा कमी अंतिम पैसेवारी आढळून आली असून उपरोक्त गावांत टंचाई परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या गावांतील सहकारी कर्जाचे रूपांतरण व शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रात ५० पैशांहून अधिक पैसेवारी असलेल्या गावांची संख्या २०४१ इतकी असून या गावांना उपरोक्त लाभ मिळणार नाही. मुबलक पाऊस होणारा तसेच धरणांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये दुष्काळाच्या छायेत सर्वाधिक म्हणजे १३४६ गावे आहेत. धुळे जिल्ह्यात ही संख्या सर्वात कमी म्हणजे ४२० गावे इतकी आहे.
उत्तर महाराष्ट्रात वर्षभर नैसर्गिक आपत्तींचे संकट कोसळत होते. या संकटात शेती पिकाचे मोठे नुकसान झाले. उन्हाळ्यात गारपीट व अवकाळी पावसाचा तडाखा सहन करावा लागल्यावर पावसासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागली. पुढील काळात पावसाने कसर भरून काढण्याचा प्रयत्न केला. तथापि, काही भागात जोरदार पाऊस तर काही भागात त्याची अखेपर्यंत प्रतीक्षा राहिली. पावसाचा हंगाम संपुष्टात आल्यावर पुन्हा नैसर्गिक आपत्तीचे संकट कोसळले. नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांत हिवाळ्यात झालेली गारपीट आणि अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक भागांत द्राक्ष बागा भुईसपाट झाल्या. डाळिंब, कांदा, गहू, मका ही पिके एका झटक्यात होत्याची नव्हती झाली. संकटांची ही मालिका संपुष्टात येत नाही तोच, दुष्काळाचे सावट गडद होऊ लागले. हिवाळ्यात बेमोसमी पाऊस कोसळत असताना दुसरीकडे शेकडो गावांत पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे चित्र आहे. या गावांच्या स्थितीचे अवलोकन शासकीय पातळीवरून सुरू होते. अपुऱ्या पावसामुळे खरीप पिकांची हंगामी पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आढळून आली, त्या गावात टंचाईसदृश स्थिती जाहीर करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्राचा विचार केल्यास एकूण ५०२० गावे आहेत. त्यातील २९७९ गावांमध्ये ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी आढळून आली आहे. त्यात नाशिक १३४६ (एकूण १९६०), धुळे ४२० (६७६), नंदुरबार ५११ (८८३), जळगाव ७०२ (१५०१) गावांचा समावेश आहे.
या गावांमध्ये अतिरिक्त सुविधा दिल्या जाणार आहेत. त्यानुसार या सर्व गावांतील अल्पमुदत कर्जाचे मध्यम मुदत कर्जात रूपांतरण केले जाईल. शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्यात आली आहे. या बाबतचे निर्देश राज्य बँकेसह संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना सूचित करण्यात आले आहे. या सवलतीचा लाभ उत्तर महाराष्ट्रातील २०४१ गावांना मिळू शकणार नाही. उपरोक्त गावांची ५० पैशांहून अधिक पैसेवारी आहे. नाशिक जिल्ह्यात ६१४, धुळे २५६, नंदुरबार ३७२, जळगाव जिल्ह्यातील ७९९ गावांचा समावेश आहे. ग्रामीण भागात हिवाळ्यात गंभीर स्थितीची जाणीव होऊ लागली आहे. नैसर्गिक संकटांनी बहुतांश शेती भुईसपाट झाली असताना आता दुष्काळाचे सावट उभे ठाकले आहे. जी गावे शासकीय यादीत समाविष्ट झाली नाहीत, त्यांना या सवलतींपासून वंचित राहावे लागणार आहे.

plenty of water in koyna dam
विश्लेषण : राज्य दुष्काळात, तरी कोयना धरणात सुरक्षित जलसाठा कसा?
maharashtra top in gst collection
जीएसटी संकलनात महाराष्ट्र अव्वल! सरलेल्या आर्थिक वर्षात तिजोरीत ३.२ लाख कोटींची भर
Maharashtras E-crop Inspection project has attracted the Central Government
महाराष्ट्राच्या ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्पाची केंद्राला भुरळ
eknath khadse
”…म्हणून मी भाजपात प्रवेश करणार आहे”, एकनाथ खडसेंचं वक्तव्य चर्चेत