विधानसभेचे माजी अध्यक्ष दिवंगत बाबासाहेब कुपेकर यांच्याविरुद्ध विधानसभा निवडणुकीत ईष्र्येने उतरलेल्या चंदगड तालुक्यातील तिन्ही पाटलांनी बुधवारी संध्यादेवी कुपेकर यांना पाठिंबा जाहीर केला. यामुळे बुधवारची संध्याकाळ कुपेकरांसाठी उजळल्याचे स्पष्ट झाले. नरसिंग गुरुनाथ पाटील, भरमू सुबराव पाटील व गोपाळराव पाटील या तिघा मातब्बरांचे पाठबळ मिळाल्याने कुपेकरांची बाजू भक्कम झाली आहे. तर दुसरीकडे विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील चुरशीचे रंग फिके होत चालल्याचे जाणवू लागले आहे. राज्य नियोजन मंडळाचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांचे चार महिन्यांपूर्वी निधन झाले. गडहिंग्लज तालुक्यातील कुपेकरांनी मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर नव्याने जोडल्या गेलेल्या चंदगड तालुक्याकडे आपला मोर्चा वळविला होता. पहिल्यांदा त्या मतदारसंघातून निवडणूक लढवितांना त्यांना या तालुक्यातील तिघा मातब्बर पाटलांशी कडवा संघर्ष करावा लागला होता. तरीही हा चक्रव्यूह भेदून कुपेकर हे चंदगडकरांची मने व मते जिंकण्यात यशस्वी ठरले होते. त्यांच्या निधनानंतर राजकीय वारसदार कोण हा प्रश्न लक्षवेधी ठरला होता. प्रारंभी त्यांचे पुतणे संग्रामसिंह कुपेकर यांचे नाव आघाडीवर होते. मात्र शरद पवार यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर संध्यादेवी कुपेकर हे नाव निश्चित करण्यात आले. संध्यादेवी कुपेकर यांना उमेदवारी मिळवून देण्यास कामगारमंत्री हसन मुश्रीफ व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार के. पी. पाटील यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली.
संध्यादेवी कुपेकर यांच्या उमेदवारीमुळे या निवडणुकीतील समीकरणे बदलू लागली आहेत. विशेषत: चंदगड तालुक्यातील तीन मातब्बर पाटलांनी कुपेकरांची पाठराखण करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी नेसरी येथे नरसिंग गुरुनाथ पाटील, गोपाळराव पाटील यांनी संध्यादेवी कुपेकर यांच्या प्रचारात सक्रिय राहणार असल्याचे जाहीर केले. हा निर्णय शरद पवार यांच्याशी चर्चा करून घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही आघाडीचा धर्म पाळत आहे, त्यांनीही तो पाळावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी व सुरेश चव्हाण-पाटील हे स्थानिक प्रमुख नेतेही हा निर्णय घोषित करताना उपस्थित होते. माजी मंत्री भरमू सुबराव पाटील यांनी अगोदरच संध्यादेवी कुपेकर या उमेदवार असतील तर आपण रिंगणात उतरणार नाही, असे जाहीर केले होते.
दरम्यान, गडहिंग्लज येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका कार्यालयात संध्यादेवी कुपेकर यांनी कार्यकर्त्यांची प्राथमिक बैठक घेतली. सर्वाना सामावून घेऊन प्रचार यंत्रणा गतिमान करण्याचे आवाहन त्यांनी केले. या वेळी तालुकाध्यक्ष बी. एन. पाटील-हुबळीकर, संग्रामसिंह कुपेकर, एन. जे. पाटील, नगराध्यक्ष मंजूषा कदम, पंचायत समितीचे सभापती इकबाल काझी, जिल्हा परिषद सदस्य व नगरसेवक उपस्थित होते. यानंतर कुपेकर यांनी माजी नगराध्यक्ष रत्नमाला घाळी, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष बी. एन. पाटील-गिजवणेकर, दत्ताजीराव कदम सूतगिरणीचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुऱ्हाडे, संग्रामसिंह नलवडे आदी प्रमुखांची भेट घेऊन निवडणुकीत मदत करावी, असे आवाहन केले. त्याचबरोबर जनता दलाचे नेते व गडहिंग्लज साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीपतराव शिंदे यांच्या निवासस्थानी भेट दिली. मात्र ते घरी उपस्थित नसल्याने चर्चा होऊ शकली नाही.