नागपूर जिल्ह्य़ातील ३० यात्रेकरू सुरक्षित

चारधाम यात्रेला गेलेले नागपूर जिल्ह्य़ातील कामठी, हिंगणा तालुका आणि गुमगाव परिसरातील ३० यात्रेकरू सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. या यात्रेकरूंमधील लक्ष्मीनारायण कावळे यांच्याशी त्यांचे पुत्र आशीष यांनी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असून सर्व ३० यात्रेकरू सुरक्षित असल्याचे लक्ष्मीनारायण यांनी सांगितले.

चारधाम यात्रेला गेलेले नागपूर जिल्ह्य़ातील कामठी, हिंगणा तालुका आणि गुमगाव परिसरातील ३० यात्रेकरू सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. या यात्रेकरूंमधील लक्ष्मीनारायण कावळे यांच्याशी त्यांचे पुत्र आशीष यांनी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असून सर्व ३० यात्रेकरू सुरक्षित असल्याचे लक्ष्मीनारायण यांनी सांगितले.
वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झालेली असल्याने हे यात्रेकरू नागपूरला केव्हा परततील हे निश्चिपणे सांगता येत नाही. यात्रेकरूंमध्ये शिक्षिका जानकी झोटिंग, डॉ. प्रवीण जोहरे, मूलचंद व विमल जोहरे यांचा समावेश आहे.
प्राप्त माहितीनुसार, उत्तराखंड महाप्रलयात विदर्भातील चारशेहून अधिक यात्रेकरू अडकलेले आहेत. नागपूर विभागातील २६३ व अमरावती विभागातील २०० यात्रेकरूंचा समावेश असून १६३ यात्रेकरू सुरक्षित असल्याची  माहिती जिल्हा प्रशासनाने दिली, परंतु उर्वरित यात्रेकरूंचा अद्याप ठावठिकाणा नाही.
विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय उत्तराखंड प्रशासनाशी सतत संपर्क करीत आहे. नागपूर जिल्ह्य़ातील १४६ यात्रेकरू  केदारनाथला गेले होते. त्यातील ४८ सुरक्षित असून ९८ यात्रेकरूंचा ठावठिकाणा लागलेला नाही. गोंदिया जिल्ह्य़ातील ७८ यात्रेकरू पुरात अडकले. त्यातील पाच यात्रेकरू सुरक्षित असून तीन यात्रेकरूंचा ठावठिकाणा लागलेला नाही. नागपुरातील तिरुपती ट्रॅव्हल्समधून ५६, अकोलातील शिवकृपा ट्रॅव्हल्समधून ३५ यात्रेकरू गेले होते. सुरक्षित यात्रेकरू गौरीकुंडपर्यंत पोहोचले असून त्यांना लवकरच नागपूरकडे रवाना करण्यात येणार आहे.
संपर्कासाठी हेल्पलाईन
संबंधित कुटुंबीयांशी संपर्क करण्यासाठी किंवा अधिक माहिती मिळण्यासाठी राज्य सरकारने दूरध्वनी सेवा सुरू केली आहे. ०९८६८१४०६६३, ०९८१८१८७७९३, ०२२-२२०२७९९०, ०२२-२२८१६६२५, ०२२-२२८५४१६८ क्रमांकावर संपर्क साधावा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 30 pilgrims of nagpure district safe