औरंगाबादमधील चौघांचा माहूर येथील तलावात बुडून मृत्यू

माहूर येथे देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या चौघांचा तेथील मातृतीर्थ तलावात बुडून मृत्यू झाला आहे.

माहूर येथे देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या चौघांचा तेथील मातृतीर्थ तलावात बुडून मृत्यू झाला आहे. आज सकाळी सव्वासहाच्या सुमारास घडलेल्या या घटनेत प्रदीप क्षीरसागर यांच्या घरातील मुलगा नीलेश (वय ३१), पत्नी उषा (वय ५२) मुलगी प्रांजली देवडे (वय ३५) व नात अवनी देवडे (वय २) यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरातील गारखेडा परिसरात शोककळा पसरली आहे.
माहूर येथील देवीच्या दर्शनासाठी प्रदीप क्षीरसागर गुरुवारी सायंकाळी कुटुंबीयांसह पोहोचले. रात्री एकवीरा भक्तनिवासात त्यांनी मुक्काम केला. सकाळी दर्शनाला जाण्यापूर्वी पत्नी उषा व मुलगी प्रांजली स्नानासाठी गेल्या. त्यांच्यासोबत दोन वर्षांची अवनीही होती. पाय निसटल्याने अवनी पाण्यात पडली. तिला वाचविण्यासाठी दोघींनी उडय़ा मारल्या. मात्र, या दोघींना पोहता येत नव्हते. अचानक आरडाओरड सुरू झाल्याने मातृतीर्थ तलावाच्या वर जीपमध्ये बसलेल्या वाहनचालक नारायण जाधव व नीलेश जाधव यांनी तीर्थकुंडाकडे धाव घेतली. तिघेही बुडत असल्याचे पाहून नीलेश क्षीरसागरनेही उडी मारली. तोही बुडाला. मृत नीलेश अविवाहित होता. मुंबई येथे तो एका खासगी कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होता. वाहनचालकांनी प्रांजलीला वाचविण्याचा प्रयत्न केला. बेशुद्ध अवस्थेत तीर्थकुंडाच्या बाहेर त्यांना आणले, मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली. माहूर पोलिसांनी सकाळी सव्वासातच्या सुमारास तीर्थकुंडातून अन्य तिघांचे मृतदेह बाहेर काढले. माहूर पोलीस ठाण्यात या अनुषंगाने गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 4 died in lake at mahur in aurangabad

ताज्या बातम्या