सांगली येथे गुटखाबंदी अंतर्गत जप्त करण्यात आलेल्या सुमारे ४ टन गुटखा शनिवारी पेटवून देण्यात आला. याची किंमत सुमारे ७ लाख रुपये इतकी आहे.
 राज्य शासनाने गुटख्यावर बंदी घातली आहे. तरीही चोरून गुटखा विकण्याचे, त्याची वाहतूक करण्याचे प्रकार सुरू आहेत. याला आवर घालण्यासाठी सांगलीतील अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. आतापर्यंतच्या कालावधीत वेगवेगळ्या कंपन्यांचा चार टन गुटखा जप्त करण्यात आला. कूपवाड औद्योगिक वसाहतीतील शिवानी ऑइल मिल येथे शनिवारी तो जाळून टाकण्यात आला. या ऑइल मिलच्या बॉयलरची क्षमता दोन टनांची आहे. त्यामुळे दोन टप्प्यांमध्ये गुटखा जाळण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त चौगुले व त्यांचे सहकारी या वेळी उपस्थित होते.